पेट्रोल व डिझेलवरील कर कमी करा अन्यथा आंदोलन; वैभववाडी भाजपाचे तहसीलदार यांना निवेदन…

7

वैभववाडी/प्रतिनिधी:-

केंद्र सरकारप्रमाणे महाराष्ट्र सरकारनेही पेट्रोल व डिझेल वरील कर कपात कमी करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा. अन्यथा भाजपाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन वैभववाडी तहसीलदार रामदास झळके यांना तालुका भाजपाच्या वतीने देण्यात आले आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीमुळे पेट्रोल व डिझेल दरात वाढ झाली. याचा मोठा फटका सर्वसामान्यांना बसला. याची दखल घेऊन केंद्र सरकारने पेट्रोल 7 रुपये व डिझेल 10 रुपये याप्रमाणे करात कपात केली. तसेच भाजपाप्रणीत राज्य सरकारांनी देखील या निर्णयाची दखल घेत पेट्रोल व डिझेलवर सर्वसाधारणपणे प्रत्येकी 7 रुपये कपात केली आहे. त्यामुळे एकूण दरात पेट्रोल वर 12 रुपये आणि डिझेलवर 17 रुपये कपात झाली आहे. शेजारच्या गोवा व कर्नाटक सरकारने देखील दरात कपात केली आहे. असे निवेदनात म्हटले आहे.

राज्यातील महाविकास आघाडी सरकार केंद्र सरकारच्या विरोधात पेट्रोल व डिझेल मुद्द्यावरून आंदोलन व मोर्चे काढतात. पण पेट्रोल व डिझेल विक्रीतून राज्य सरकार कर कपात करून सर्वसामान्यांना कुठलाही दिलासा देत नाहीत. हे निषेधार्ह आहे असे निवेदनात म्हटले आहे. निवेदन देतेवेळी भाजपा तालुकाध्यक्ष नासीर काझी, पं.स. उपसभापती अरविंद रावराणे, माजी सभापती भालचंद्र साठे, माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र राणे, व्यापारी मंडळ अध्यक्ष रत्नाकर कदम, युवा मोर्चा अध्यक्ष किशोर दळवी, शक्ती केंद्र प्रमुख प्रदीप नारकर, शक्ती केंद्र प्रमुख प्रदीप जैतापकर, दाजी पाटणकर, रामदास घुगरे, ललित रावराणे व पदाधिकारी उपस्थित होते.