कोकणच्या लाल मातीत गुणवत्ता ठासून भरलेली- पद्मश्री मधु मंगेश कर्णिक…

33

कणकवली/प्रतिनिधी:-

कलातपस्वी आप्पा काणेकर चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने शहरातील रामेश्‍वर प्लाझा संकुलातील रॉयल मिनी सभागृहात कै.सौ.उमा काणेकर स्मृती पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला होता. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ बालसाहित्यिक बाबूराव शिरसाट, ज्येष्ठ चित्रकार संजय शेलार, चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक ÷अध्यक्ष ललित लेखक महेश काणेकर, कार्याध्यक्ष डॉ. श्रावणी काणेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

श्री. कर्णिक म्हणाले, कोकणातील समाज प्रतिभावंत असून लाल मातीमध्ये गुणवत्ता ठासून भरलेली आहे. विविध क्षेत्रांमध्ये चांगले काम करणार्‍यांचे कौतुक करणे ही समाजाची जबाबदारी आहे. समाजाने केलेल्या कौतुकामुळे त्यांना अधिकाधिक चांगले काम करण्याची उर्मी मिळत असते. कोकणातील प्रत्येक व्यक्तीमध्ये उपजत अशी गुणवत्ता आहे. या गुणवत्तेच्या जोरावर अनेकांनी आपल्या कामातून स्वतःचा एक वेगळा ठसा उमटवून कोकणचे नाव रोशन केले आहे. ही सर्व मंडळी कोकणीच रत्ने आहेत. या मंडळींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रत्येकाने वाटचाल केली पाहिजे. सामाजिक कार्य करून जे समाधान मिळते ते समाधान तुम्ही कितीही पैसे कमावलात तरी भेटणार नाही. कलातपस्वी आप्पा काणेकर चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने दिला जाणारा कै.सौ.उमा काणेकर स्मृती पुरस्काराचा उपक्रम स्तुत्य असून तुम्ही दिलेल्या पुरस्कारांमुळे त्या व्यक्तीला चांगले काम करण्यासाठी आत्मबळ मिळते, असे त्यांनी सांगितले.

ब्रिटीश राजवटीमध्ये भारतीयांकडे असलेल्या गुणवत्तेकडे अक्षम्यपणे दुर्लक्ष केले गेले होते. कारण भारतीयांमध्ये असलेल्या गुणवत्तेबाबत ब्रिटीशांच्या मनात घृणा होती. स्वातंत्र्यानंतर गेल्या 75 वर्षांत भारतीयांमधील असलेल्या गुणवत्तेला वाव देण्याचे काम आपल्या राज्यकर्त्यांनी व समाज व्यवस्थेने केले म्हणून माझ्या सारख्या सर्वसामान्य साहित्यिकाला पद्यश्री हा मानाचा पुरस्कार मिळू शकला. या पुरस्काराचे श्रेय सामाजातील प्रत्येक घटकाला जाते, असे त्यांनी सांगून ज्या व्यक्तींना कै.सौ.उमा काणेकर स्मृती पुरस्कार मिळाला आहे, त्यांनी या पुरस्काराचा तोल आणि मोल सांभाळून ठेवावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

बाबूराव शिरसाट म्हणाले, पद्यश्री मधूमंगेश कर्णिक हे कोकणचे रत्न असून साहित्य क्षेत्रात त्यांनी स्वतःची एक वेगळी नाममुद्रा तयार केली आहे. ही नाममुद्र तयार करण्यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागला आहे. या संघर्षातून त्यांनी साहित्य क्षेत्रात स्वतःचे वलय निर्माण केले आहे. त्यामुळे नवोदित साहित्यिकांचीसाठी त्यांची ही संषर्षकाथा पे्ररणादायी ठरेल, अस सांगतानाच नवोदित साहित्यिकांनी विविध विषयावर प्रखरपणे लिहावे, असा सल्लाही त्यांनी दिला.

यावेळी आप्पा काणेकर चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने दिला जाणार बाल साहित्य सेवा पुरस्कारप्राप्त लेखक प्रकाश केसरकर, कै. उमा काणेकर स्मृती कृतिशील शिक्षका पुरस्कारप्राप्त कल्पना मयले, समाजसेवी अशा दुर्गा महाडेश्‍वर, मातृहृदयी अंगणवाडी सेविका सुविधा शिरसाट, विज्ञाननिष्ठ विद्यार्थिनी फातिमा मेस्त्री यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. याशिवाय ओसरगाव शाळा नंबर 1 या प्रशालेला आदर्श शाळा म्हणून जि.प. डवरवाडी शाळेला उपक्रमशील शाळा म्हणून गौरविण्यात आले. तसेच चॅरिटेबल ट्रस्टतर्फे घेण्यात आलेल्या निबंध व चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीसे प्रदान करण्यात आले. त्याचप्रमाणे अभिनेते व दिग्दर्शक सुहास वरुणकर, श्रीदेव रामेश्‍वर संस्थान आचर्‍याचे मंानकरी, हुद्देदार अरविंद सावंत, प्रा. हरिभाऊ भिसे, गिर्ल्बड फर्नांडिस यांना विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदेश तांबे यांनी केले. आभार कांचन खानोलकर यांनी मानले. या पुरस्कार सोहळ्यास मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.