आमदार नितेश राणेंना कणकवली पोलिसांची नोटीस; शिवसैनिकावरील हल्ल्याप्रकरणाची करणार चौकशी…

28

सिंधुदुर्ग/प्रतिनिधी:-

सिंधुदुर्ग येथे शिवसेनेच्या एका कार्यकर्त्यांवर नुकताच जीवघेणा हल्ला झाला. हा हल्ला भाजपचे नेते आमदार नितेश राणे यांनी केल्याचा आरोप शिवसेनेचे नेते आणि महाविकास आघाडीचे जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी केला आहे. त्यानंतर पोलिसांनी नितेश राणे यांना चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापलं आहे.

सतीश सावंत यांचे प्रचार प्रमुख असलेल्या संतोष परब यांच्यावर कणकवलीत शनिवारी ता. 18 डिसेंबर रोजी हल्ला झाला होता. यानंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार नितेश राणे यांच्यावर या प्रकरणी आरोप केले आहेत. नंबर प्लेट नसलेल्या इनोव्हा कारने परब यांच्या दुचाकीला मागून धडक देऊन गाडीतून दोन अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्राने परब यांच्यावर हल्ला केला होता. हल्ला करून मारेकऱ्यांनी कनेडीच्या दिशेने पलायन केले होते.

हा हल्ला राजकीय असून तो नितेश राणे व त्यांचे सहकारी गोट्या सावंत यांनी घडवून आणल्याचा आरोप सतीश सावंत यांनी केला आहे. नितेश राणे यांना अटकेसाठी शिवसेनेचे पदाधिकारी आक्रमक झाले होते. त्यानंतर पोलिसांनी राणे यांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावले आहे. आता राणे चौकशीला हजर राहणार यावरून राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. यावरून राणे यांचे समर्थकही आक्रमक झाल्याचे समजते.

दरम्यान, सतीश सावंत यांचे निकटवर्ती असलेले करंजे गावचे माजी सरपंच शिवसैनिक संतोष परब यांच्यावर अज्ञात दोन जणांनी चाकू हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले आहे. या हल्ल्यामागे सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत परब यांचा थेट सहभाग असल्याने त्यांच्यावर हा हल्ला झाल्याचे बोलले जात आहे.

याबाबत माहिती अशी, संतोष परब हे कणकवली शहरातील कनक नगर येथे साक्षी अपार्टमेंटमध्ये राहतात. शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास शहरातून मोटरसायकलने घराकडे जात असताना घरापासून काही अंतरावर नरडवे रस्त्यावर सिल्वर कलरच्या इनोव्हा गाडीतून अज्ञात आणि त्यांना त्यांच्या दुचाकीला धडक दिली. ते खाली पडल्यानंतर गाडीतून उतरलेल्या दोघांनी त्यांच्या छातीत धारदार हत्याराने हल्ला केला. या घटनेनंतर जखमी परब यांना येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.