वैभववाडी/प्रतिनिधी:-
‘शेतीत काम करणं हे दुय्यम काम नसून ते प्रतिष्ठेचं काम आहे. त्यामुळे आपला पालनकर्ता असलेल्या शेतकऱ्यांच्या प्रति सर्वांच्या मनात कायमच आदरभाव असावा.भविष्यात या विद्यार्थ्यांनी शेतीकडे करियर या दृष्टीनेही पाहावं.’ असं प्रतिपादन वैभववाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जयप्रकाश परब यांनी कोकिसरे येथे केले.
शेती व शेतकरी यांच्याविषयी आत्मीयता वाढीस लागावी,यासाठीच्या जि. प. सिंधुदुर्गच्या या उपक्रमात तालुक्यातील श्री महालक्ष्मी वि. मं. कोकिसरेच्या परिसरात मुलांनी प्रत्यक्ष शेतात मनमुराद आनंद लुटला. या उपक्रमात तालुक्यातील अधिकारी- कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन प्रत्यक्ष शेतीचा आनंददायी अनुभव घेतला.
श्री महालक्ष्मी विद्यामंदिर कोकिसरे, श्री सिद्धेश्वर विद्यामंदिर कोकिसरे व विद्यामंदिर कोकिसरे बांबरवाडी या तीन शाळांचे संयुक्त आयोजन असलेल्या या उपक्रमात जेवणातील मेनूही खास होता. प्रत्यक्ष शेतात काम केल्यानंतर केळीच्या पानात वाढलेली नाचणीची व तांदळाची भाकरी, टाकळ्याची भाजी, भारंगीची भाजी, शेवग्याची भाजी, अळू, गोलमाचा खारवणी, खोबऱ्याची ओलीचटणी, घरगुती लोणचं या पदार्थांचा समावेश असलेल्या शिदोरीचा आस्वाद उपस्थितांनी घेतला. उपस्थित मान्यवरांचे रानफुलांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी अवधूत नारकर, सरपंच, कोकिसरे, जयप्रकाश परब, गटविकास अधिकारी, पं. स. वैभववाडी,मुकुंदजी शिनगारे, गटशिक्षणाधिकारी, पं. स. वैभववाडी, शशिकांत भरसट,कृषी अधिकारी,अशोक वडर, विस्तार अधिकारी (शिक्षण), सुधाकर जाधव,विस्तार अधिकारी, लक्ष्मण हांडे, विस्तार अधिकारी, विशाल चौगुले, विस्तार अधिकारी, सतीश रावराणे, शाखा अभियंता, मनोज सावंत, कनिष्ठ सहाय्यक(प्रशासन ), शिवाजी पवार, केंद्रप्रमुख खांबाळे, संतोष टक्के, अध्यक्ष, रोटरी क्लब वैभववाडी,प्रदीप नारकर, सदस्य, ग्रामपंचायत कोकिसरे, ग्रामविकास अधिकारी संभाजी वाघमोडे, सविता लांडगे, तलाठी,दीपक फाटक, पोस्टमास्तर कोकिसरे, प्रकाश बडमे, अध्यक्ष, शा. व्य. समिती, बंधू वळंजू तसेच शिक्षण विभाग व समग्र शिक्षा अभियान वैभववाडीचे कर्मचारी तसेच मुख्याध्यापक सुप्रिया शेट्ये, शिक्षक प्रफुल्ल जाधव, अमोल येनगे, गजानन टक्के, योगेश खोसरे, जयवंत मोरे याशिवाय शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालकवर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते.