वैभववाडी येथे आंतरराष्ट्रीय पर्वत दिनानिमित्त पर्वत पूजन कार्यक्रम संपन्न…

5

वैभववाडी/प्रतिनिधी:-

११ डिसेंबर हा दिवस संपूर्ण जगभर ‘आंतरराष्ट्रीय पर्वत दिन’ म्हणून साजरा केला जातो. वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था संचलित आनंदीबाई रावराणे महाविद्यालय परिसरात पर्वत पूजन कार्यक्रम संपन्न झाला.

अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाशी संलग्न असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा गिर्यारोहण संघटनेने जिल्ह्यातील विविध शाळा, महाविद्यालये व संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमांनी आंतरराष्ट्रीय पर्वत दिन साजरा केला.

वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था संचलित आनंदीबाई रावराणे महाविद्यालयातील इतिहास विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा गिर्यारोहण संघटना व सामाजिक वनीकरण विभाग वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आज सोमवार दिनांक १२ डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय पर्वत दिनानिमित्त पर्वत पूजन कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.एन.व्ही.गवळी, इतिहास विभाग प्रमुख व सिंधुदुर्ग जिल्हा गिर्यारोहण संघटनेचे सचिव प्रा.एस.एन. पाटील, डॉ.बी.डी.इंगवले, प्रा. संजीवनी पाटील, सामाजिक वनीकरण वैभववाडीचे वनरक्षक श्री.एस.एस.कुंभार, श्रीम.व्ही.बी.जाधव, वनमजूर श्री.तात्या ढवण व विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी प्रा.एस.एन.पाटील यांनी सर्वांचे स्वागत करून आंतरराष्ट्रीय पर्वत दिनाचे महत्त्व सांगितले. युनोच्या सुचनेनुसार २००३ पासून ११ डिसेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय पर्वत दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पर्वताप्रति कृतज्ञता व्यक्त करणे व पर्वतांचे संवर्धन करण्यासाठी जागृती करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पर्वत पूजन कार्यक्रम करण्यात आला. यावेळी वनरक्षक श्री.एस.एस.कुंभार यांनी सामाजिक वनीकरण विभागाद्वारे वनांचे संवर्धन केले जात असून ती आपली सर्वांची जबाबदारी असल्याचे सांगितले. पर्वत, पर्यावरण आणि मानव यांचे अतुट नाते आहे. या पर्यावरणाचे संवर्धन ही काळाची गरज आहे असे डॉ.एन.व्ही.गवळी यांनी मार्गदर्शनात सांगितले. प्रा.पाटील यांनी विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस प्रतिज्ञा घेण्यात आली. शेवटी डॉ.बी डी.इंगवले यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयातील इतिहास विभागाच्यावतीने करण्यात आले होते.