सर्पदंशाने सांगेलीतील शेतकऱ्याचा मृत्यू…

87

सावंतवाडी/प्रतिनिधी:-

सावंतवाडी तालुक्यातील सांगेली – काजरमळा येथील राजेश पुंडलिक रेमुळकर (वय ४८) यांचा सर्पदंशाने जागीच मृत्यू झाला.ही घटना शनिवारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. रेमुळकर हे गुरांसाठी चारा कापण्यासाठी शेतात गेले होते.

याबाबत अधिक माहिती अशी की, श्री. रेमुळकर हे आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास आपल्या घराच्या बाजूला असलेल्या शेतात गुरांसाठी चारा कापण्यासाठी गेले होते. यावेळी अचानक त्यांना नागाने दंश केला. त्यामुळे ते ओरडले. त्यांचा आवाज ऐकून घरातील व्यक्ती त्या ठिकाणी गेले. तोपर्यंत ते बेशुद्ध पडलेले होते. अशा परिस्थितीत त्यांना गावातील माजी जिल्हा परिषद सदस्य पंढरी राऊत यांच्यासह पोलीस पाटील विठ्ठल डोईफोडे आदींनी सावंतवाडी कुटीर रूग्णालयात अधिक उपचारासाठी दाखल केले. परंतु उपचारापूर्वी त्यांचे निधन झाले असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. याची माहिती मिळतात माजी नगराध्यक्ष संजू परब, जिल्हा बँकेचे सदस्य रवींद्र मडगावकर, माजी अध्यक्ष गजानन गावडे आदींनी त्या ठिकाणी धाव घेतली. श्री. रेमुळकर हे शेतकरी होते. त्यांची घरची परिस्थिती बेताची आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.