माध्यमिक विद्यामंदिर कनेडी हायस्कूल मध्ये स्पर्धा परीक्षेचे आयोजन…

262

कणकवली / प्रतिनिधी :- कनेडीगट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदीर कनेडी, श्री. मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ आर्टस् अँड कॉमर्स कनेडी, श्री. तुकाराम शिवराम सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स या प्रशालेत ‘K. G. S. P. FOUNDER MEMBER’S MEMORY TALENT SEARCH सन 2023’ या स्पर्धा परीक्षेचे आयोजन मंगळवार दि.१२/०९/२०२३ रोजी प्रशालेत करण्यात आले. सदर स्पर्धा परीक्षा पहिला गट – इयत्त्ता -पाचवी ते सातवी, दुसरा गट -इयत्ता आठवी ते नववी, तिसरा गट – इयत्ता अकरावी अशा तीन गटात घेण्यात आली होती.

या स्पर्धा परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे.

सामान्यज्ञान – ५० गुण
इंग्रजी – २० गुण
गणित -. २० गुण
बुद्धिमत्ता – १०गुण
एकूण गुण – १०० गुण

अशी ही परीक्षा बहुपर्यायी म्हणजेच (multiple choice answers method) या प्रमाणे घेण्यात आली. प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतंत्र उत्तरपत्रिका (OMR sheet ) व परीक्षेसाठी 2 तासांचा वेळ देण्यात आला.

सदर स्पर्धा परीक्षा ही संस्थेच्या संस्थापक सदस्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ घेण्यात आलेली असून,गेल्या अनेक वर्षापासून माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेत माध्यमिक विभागामार्फत (इयत्ता 5 वी ते 10वी) सकाळी 10.10 ते 10.40 या वेळेत सुपर सेशन तासिका घेतली जाते. यामध्ये लेखन-वाचन,पाढे पाठांतर, चित्रकला,मातीकाम, आकाशकंदील तयार करणे, कागदकाम तसेच हस्ताक्षर सुधार हे उपक्रम दररोज घेतले जातात.या वर्षीपासून या तासिकेत दररोज 5 जनरल नॉलेज चे प्रश्न तसेच इंग्रजी शब्द विद्यार्थ्यांना दिले जात आहेत. विद्यार्थ्यांचे सामान्य ज्ञान वाढावे आणि भविष्यात होणाऱ्या स्पर्धा परीक्षा तसेच विविध प्रवेश परीक्षांची विद्यार्थ्यांची चांगली तयारी व्हावी आणि स्पर्धेच्या युगामध्ये विद्यार्थी पुढे जाण्यासाठी या उदात्त हेतूने स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आलेले होते.

एकूणच हा एक अभिनव उपक्रम संस्थेच्या मार्फत घेण्यात आला, यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये मोलाची भर पडणार आहे. त्यांच्या बौद्धिक क्षमतेचे मापन ह्या परीक्षेद्वारे होणार आहे. या परीक्षेचा उद्घाटन व प्रश्नपत्रिका प्रकाशन समारंभ सकाळी ठीक १०.०० वाजता आयोजित करण्यात आलेला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शालेय समिती चेअरमन सन्मा.श्री.आर.एच.सावंत, प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री. सुमंत दळवी तसेच पर्यवेक्षक सन्मा.श्री. बयाजी बुराण, प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी उपस्थिती होते. या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन व आभार श्री. पी एन मसुरकर सर (सहा.शिक्षक माध्यमिक) यानी केले.