अवजड वाहनांबाबत शासनाचा तुघलकी निर्णय…

34

काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांची टीका…

 राजू तावडे / सावंतवाडी :- सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेशोत्सव काळात अवजड वहानाना गणेशभक्तांचा कोणताही विचार न करता बंदी घालण्याचा तुघलकी निर्णय शासनाने घेतला आहे. गणेशोत्सव काळात लोकांना लागणारे साहित्य उदा. कपडे, सजावटीचे साहित्य,फटाके इत्यादी. अनेक वस्तूंची गणेशोत्सव काळात गरज असते. या वस्तूंची वाहतूक करणारी वाहने ही अवजड वहाने आहेत म्हणून त्यांना गणेशोत्सव काळात बंदी घातल्याने सदर वस्तूंचा पुरवठा कमी होऊन, त्या वस्तूंचे भाव गगनाला भिडतील किंवा त्या वस्तू लोकांना मिळणार नाहीत. त्यामुळे गणेश भक्तांच्या उत्साहावर पाणी पेरण्याचे काम शासन करीत आहे. अशी टीका काँग्रेसचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी केली आहे.

एकीकडे शासन व जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महामार्ग 97% टक्के पूर्ण झाला आहे,असे म्हणतात आणि दुसरीकडे महामार्गावर वाहतूकीला बंदी घालत आहेत. गणेशोत्सव काळात खरेतर वाळूचे डंपर,ट्रेलर इत्यादींवर बंदी घालण्याची गरज आहे.

शासनाच्या या तुघलकी निर्णयामुळे कोल्हापूर, बेळगाव वरून येणाऱ्या वाहनाना गगनबावडा, फोंडा आणि आंबोली घाटातून येण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे तसेच गोवा येथून येणारी वाहने ही पत्रादेवी येथे थांबवल्यामुळे तेथे लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. शासनाने आपला तुघलकी निर्णय तातडीने मागे घेऊन सिंधुदुर्ग वासीयांना दिलासा द्यावा, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख यांनी केली आहे.