सावंतवाडीतील भटक्या व पायाला जखम झालेल्या युवकाची सामाजिक बांधिलकी कडून दखल…

287

राजू तावडे / सावंतवाडी :- शहरामध्ये गेले कित्येक दिवस भटकत असलेला कर्नाटक येथील मतिमंद प्रशांत नामक युवका पासून शहरातील जनतेला काही प्रमाणात त्रास होत होता. त्याच्या उजव्या पायाला मोठी जखम होऊन त्याला गॅंग्रीन झाले आहे. त्यामुळे त्याला खूप वेदना होत होत्या. आज सकाळपासून तो तलावाच्या काठी उन्हातच पडून होता. त्याची केविलवाणी परिस्थिती पाहून सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव यांनी त्याची दखल घेतली. त्याला असंख्य वेदना होत होत्या. त्याचे कपडे घाण झाले होते व अंगातून दुर्गंधी वाहत होती. जाधव व त्यांच्या सहकार्याने सर्वप्रथम त्याचे केस दाढी करून त्याला स्वच्छ आंघोळ घातली. त्यानंतर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. यूपी येथील युवक शैलेश ठाकूर यांनी सामाजिक भान राखून त्याची केस दाढी केली. होमगार्ड राजन सांगेलकर व पोलीसांनी सामाजिक बांधिलकीला सहकार्य केले. उपजिल्हा रुग्णालयामध्ये प्राथमिक उपचार करून त्याला अधिक उपचारासाठी ओरोस येथील जिल्हा रुग्णालयामध्ये हलवण्यात आले. सदर बेवारस यूवक बरा झाल्यानंतर त्याला सविता आश्रम मध्ये पाठवण्याचे सामाजिक बांधिलकी संस्थेने ठरविले आहे. याप्रसंगी जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर, डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभल्याचे रवी जाधव यांनी सांगितले.