रंग भरण स्पर्धा म्हणजे मुलांना मोबाईल पासून दूर ठेवण्याची किमया – ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे… 

35

राजू तावडे / सावंतवाडी :- चित्र रंगभरण स्पर्धेमुळे सतत मोबाईल मध्ये दंग असलेले पालक व मुले ही काही काळासाठी निसर्ग रम्य वातावरण रमून गेली. मोबाईल पासून मुलांना दूर ठेवण्याची किमया सावंतवाडी पत्रकार संघाने व सैनिक स्कूल आंबोलीच्या उपक्रमातून घडली. हा उपक्रम नक्कीच चांगला असून त्यामुळे एक चांगला पायंडा पाडला आहे. अशा उपक्रमासाठी आपल्या मुलांना सहभागी करणाऱ्या पालकांचे कौतूक आहे, असे मत जेष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे यांनी आज येथे व्यक्त केलेे.

सावंतवाडी तालुका पत्रकार संघ आणि आंबोली सैनिक स्कुल यांच्या माध्यमातून सावंतवाडी येथील जगन्नाथराव भोसले उद्यानात आयोजित करण्यात आलेल्या रंगभरण स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत दोनशेहून अधिक मुलांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेचे उद्घाटन सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोलीचे सचिव सुनिल राऊळ यांच्याहस्ते करण्यात आले.

यावेळी सैनिक स्कूलचे संचालक जॉय डॉन्टस, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर, सिंधुदुर्ग डिजिटल मीडिया सेलचे अध्यक्ष अमोल टेंबकर, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, सैनिक स्कूलचे कार्यालयीन सचिव दिपक राऊळ, सचिव मयूर चराठकर, हेमंत मराठे, वैभव अंधारे, गिरीश डिचोलकर, वैशाली खानोलकर, रुपेश पाटील, दीपक गावकर, उमेश सावंत, शैलेश मयेकर, साबाजी परब, राजू तावडे, नरेंद्र देशपांडे, रामचंद्र कुडाळकर, सैनिक स्कूलचे मुख्यध्यापक एन. डी. गावडे, ऋषिकेश गावडे, राजन गावडे आदी उपस्थित होते.

यावेळी सुनिल म्हणाले, आंबोली सैनिक स्कुलच्या माध्यमातून आम्ही मुलांमधून देशासाठी सैनिक बनविण्याचे कार्य करत आहोत. या शाळेतून आजपर्यंत संरक्षण दलामध्ये चार अधिकारी झाले असून, कित्येक मुले ही वेगळ्या पदावर शासकीय व खाजगी सेवेमध्ये कार्यरत आहेत. या चित्रकला स्पर्धेच्या माध्यमातून उद्या घडणाऱ्या कलाकारांना आम्ही प्रोत्साहन देत आहोत. त्याचा फायदा मुलांना भविष्यात नक्कीच होईल.

यावेळी सावंतवाडी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर यांनी मुलांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक हरीश्चद्र पवार, सुत्रसंचालन विनायक गावस तर आभार विजय राऊत यांनी मानले.