वेंगसर येथे ट्रक व मोटर सायकल यांच्यात समोरासमोर धडक…

520

मोटारसायकल स्वार जागीच ठार…

वैभववाडी / प्रतिनिधी :- तालुक्यातील वेंगसर गाडीवाडी रस्त्यावरील एका अवघड वळणावर ट्रक व मोटर सायकल यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या भिषण अपघातात मोटारसायकल स्वार जागीच ठार झाला आहे. या अपघातात प्रकाश शांताराम शेलार वय ५५ रा. कासार्डे दाबवाडी यांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात शनिवारी सकाळी ९.४५ वा. सुमारास घडला, आहे. अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मयत प्रकाश शेलार हे कामानिमित्त आपल्या ताब्यातील मोटार सायकल एमएच ०७ झेड ६७५२ घेऊन सकाळी ८.३० वा. सुमारास कासार्डे येथुन निघाले होते. खारेपाटण ते आजिवली असा प्रवास करीत असताना वेंगसर घाडीवाडीनजीक एका अवघड वळणावर आले असता, समोरुन ट्रक चालक राकेश नारायण शिंदे वय ३३ रा. खारेपाटण संभाजीनगर हा आपल्या ताब्यातील जांभ्या दगडाचा ट्रक क्र.एमएच०४इवाय ६६३१ घेऊन खारेपाटणकडे जात होता. यांच्यात समोरासमोर धडक झाली. या अपघातात मोटारसायकल स्वार शेलार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे जागीच ठार झाले. अपघाताची माहीती समजताच स्थानिक ग्रामस्थ माजी सरपंच सुभाष कांबळे, विलास पावसकर, पोलिस पाटील सुनिल कांबळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघाताची माहीती वैभववाडी पोलिसांना मिळताच पोलिस हवालदार शैलेश कांबळे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मयताच्या खिशातील ओळखपञ पाहीले. त्यावरुन मयताचे नाव व गाव पोलिसांना समजले. त्यावरुन त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्यात आला. दरम्यान मृतदेह रुग्णवाहीकेतुन शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. त्याठिकाणी शवविच्छेदन करुन सायंकाळी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

कासार्डे देऊळकरवाडी येथील मयत शेलार हे कासार्डे दाबवाडी येथे राहात होते. त्यांचे त्याठिकाणी किराणा मालाचे दुकान आहे. तसेच खाजगी घर बांधण्याची कामे घेत होते. त्यातुन ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. घरातील कर्ता पुरुष गमावल्याने या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुली व दोन मुलगे असा परिवार आहे.

याप्रकरणी ट्रक चालकावर परिस्थितीचा विचार न करता अविचाराने हयगयीने वाहन चालवून अपघातास कारणीभूत ठरल्या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास वैभववाडी पोलीस निरीक्षक श्री फुलचंद मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार शैलेश कांबळे करीत आहेत.