आंबोली घाटात ट्रकची दुचाकीला धडक; बेळगावचे तिघे युवक गंभीर जखमी…

33

राजू तावडे / सावंतवाडी :- ट्रकने दुचाकीला धडक दिल्यामुळे बेळगाव येथील तिघे युवक गंभीर जखमी झाले आहेत. ते एकाच दुचाकीने प्रवास करीत होते. ही घटना आज मंगळवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास आंबोली घाटात नानापाणी वळणावर घडली.

अपघातानंतर ट्रक चालकाने पळ काढला. त्यामुळे ते युवक काही काळ रस्त्यावरच पडले होते. त्यानंतर याबाबतची माहिती प्रवाशांनी पोलिसांना दिल्यानंतर रुग्णवाहिकेला पाचरण करण्यात आले. परंतु ती उपलब्ध न झाल्यामुळे अखेर पोलिस हवालदार दत्ता देसाई व पोलीस नाईक मनीष शिंदे यांनी तिघांनाही आपल्या व्हॅन मधून सावंतवाडी रुग्णालयात दाखल केले.

जीलानी मेहबूब शेख ( २७), अजाण इस्ताक शेख ( २६), नुर अहमद सनदी ( ३०, सर्व रा.बेळगाव) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर सावंतवाडी येथील कुटीर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांना अधिक उपचारासाठी बेळगाव येथे नेण्यात येणार असल्याचे त्यांच्या नातेवाईकांकडून सांगण्यात आले.