शांतादुर्गा गुरुकुल शाळेचा वर्षारंभ तथा विद्यारंभ कार्यक्रम संपन्न…

82

फोंडा / प्रतिनिधी :- श्री शांतादुर्गा शिक्षण समितीच्या श्री शांतादुर्गा गुरुकुल शाळेचा नुकताच वर्षारंभ तथा विद्यारंभ कार्यक्रम कवळे येथील डॉ. प्रेमानंद मुकुंद कुवेलकर सभागृहात उत्साहात संपन्न झाला.

पंचकोश विकसनाच्या उद्देशाने सुरू झालेल्या शांतादुर्गा गुरुकुल शाळेचे वर्षारंभ आणि विद्यारंभ हे दोन महत्वाचे संस्कार असुन शैक्षणिक प्रवासाचा निर्धारपूर्वक संकल्प प्रत्येक विदयार्थी ह्या आश्वासक संस्कारांमार्फत करतो .

या विशेष कार्यक्रमाचे अध्यक्ष या नात्याने शिक्षणतज्ञ माननीय श्री प्राध्यापक रमेश सप्रे उपस्थित होते. प्रमुख अतिथी स्थानी श्री शांतादु‌र्गा देवस्थान कमिटीचे अध्यक्ष श्री त्रिलोकनाथ बोरकर, तसेच कमिटीचे मुखत्यार श्री मनोज हेदे ; तर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ज्ञानप्रबोधिनी गुरुकुल निगडी चे प्रमुख श्री श्रीकृष्णदादा अभ्यंकर, मुद्दामहून उपस्थित राहिले होते.

कार्यक्रमाची सुरवात गुरुकुलच्या शिक्षिका अंकिता गांवकर यांनी गायलेल्या शारदास्तवनाने झाली. श्री सरस्वती देवीच्या प्रतिमेला पुष्ये वाहुन औपचारिक कार्यक्रमाची सुरुवात झाली. समितीचे अध्यक्ष श्री श्रीकुमार सरज्योतिषी यांनी प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत केले. आपल्या स्वागतपर भाषणात श्री सरज्योतिषी यांनी श्री शांतादुर्गा गुरुकुल हा आपला स्वप्न प्रकल्प होता, पण अथम परिश्रमाने वाढविलेल्या या गुरुकुलाचा विस्तार हा शांतादुर्गेच्या कृपेने आपण व आपला संघ नक्कीच करीन असे आश्वासन त्यांनी दिले.

पंचकोश विकसन संकल्पनेवर आधारित गुरुकुल, पाचही कोशाबद्दल प्रत्येक शिक्षीकने विशेष माहिती देत आपले विचार मांडले. कु . अंकिता गावकर, कु. सलोनी वाडीकर, कु आरती कलशेट्टी, कु अपूर्वा माताडे व कु संपदा परवार यानी पंचकोशावर तर विदयार्थी घडन कसे व्हावे यावर गुरुकुलचे प्रमुख श्री संभाजी खामकर यांनी आपले विचार व्यक्त केले.

गुरुकुलच्या विदयार्थिनींतर्फे सुंदर व संस्कारीत अशी उपासना यावेळी सादर करण्यात आली. यावेळी स्नातक संघातर्फे सर्व विदयार्थ्यांचे औक्षण करण्यात आले. येत्या शालेय वर्षांकरिता सर्व विद्यार्थ्यानी तसेच शिक्षकांनीही आपापले संकल्प घेतले.

विदयार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन करताना श्री त्रिलोकनाथ बोरकर यानी आत्ताच्या विदयार्थी तसेच शिक्षकांना मार्गदर्शनाची अत्यंत गरज असल्याचे सांगितले. चांगल्या शिक्षणपूर्ण मार्गदर्शनाने एक शिक्षक हा एक सर्वोत्तम विदयार्थी घडवू शकतो असे प्रतिपादन त्यानी केले. संकल्प हा केवळ १ वर्षापुरता मर्यादित न ठेवता तो – ३ ते ५ वर्षासाठी तरी असावा असेही ते यावेळी म्हणाले. श्री शांतादुर्गा शिक्षण समिती ही फोंड्यातील एक नावाजलेली शिक्षण संस्था असल्याचे व ह्याच संस्थेचे श्री शांतादुर्गा गुरुकुल शाळा ही खुप यशस्वी ठरो अशा शुभेच्छा देताना भारतीय संस्कृती काटेकोरपणे टिकवून ठेवण्याचे काम हे श्री शांतादुर्गा गुरुकुल करत असल्याने, भविष्यात ही शाळा खुप यशस्वी होईलच अशी दृढ आशा त्यांनी व्यक्त केली.

ज्ञानप्रबोधिनी गुरुकुल, निगडी चे प्रमुख श्री श्रीकृष्ण दादा अभ्यंकर हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मुद्दामहून या सोहळ्याला उपस्थित राहिले . अथक संघर्षातुन आज १२ वर्षाचे तप श्री शांतादुर्गा गुरुकुलने पुर्ण केले; पण तीव्र निश्चयशक्तीने आखलेले ध्येय गुरुकुल अवश्य गाठेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ज्या गोष्टी निसर्गनियमा नुसार घडणारच

त्यांचा संकल्प न करता जे आपणाला घडवून आणायचे असते त्या गोष्टींचा संकल्प करायचा असतो असे मार्गदर्शनपर भाष्य त्यांनी केले. संकल्प सोडताना तो कोणत्या कोषाचा विकास करेल या विचारानेच संकल्प निवडावा असे सांगताना पंचकोशांवर आधारित विविध संक ल्यांचे अमृतमय ज्ञानही विद्यार्थ्यांना पाजले.

या विशेष सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले ते प्राध्यापक श्री रमेश सप्रे यांचे सत्र. मुलांना बोध कथांव्दारे संकल्पाचे महत्व, एकाग्रता, संस्कार या सर्व विषयांवर त्यांनी बहुमुल्य मार्गदर्शन केले. गुरुकुल ही संस्कृतीची पाळेमुळे घट्ट जपुन आहे व जर योग्य मार्गदर्शन लाभले तर हे गुरुकुल यशाच्या शिखराकडे नक्कीच पोचेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आपल्या आश्रमाची व्दारे ही गुरुकुलसाठी सदैव खुली असल्याचेही त्यानी यावेळी स्पष्ट दिले. गुरुकुल वृद्धीसाठी मार्गदर्शन देण्यास आपण वेळोवेळी उपलब्ध असु असे आश्वासनही त्यानी यावेळी दिले.

श्री शांतादुर्गा गुरुकुलचा वटवृक्ष होण्यास आपण आपले संपूर्ण सहकार्य देवु असे दृढ आश्वासन गुरुकुल चे प्रमुख श्री संभाजी खामकर यानी दिले.

श्री शांतादुर्गा गुरुकुल शाळा केवळ देवीच्या आशिर्वादानेच १२ वर्षाचे यशस्वी तप पूर्ण करू शकले व पुढेही हे गुरुकुल बहरत जाईल व देवीची कृपा सर्व विद्यार्थीवर्गावर होत राहु अशी आशा समितीचे अध्यक्ष श्री श्रीकुमार सरज्योतिषी यांनी व्यक्त केली.

गुरुकुल साठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या काम करणाऱ्या व आपले अनमोल सहकार्य दिलेल्या प्रत्येक व्यक्तिचा यावेळी इथे सन्मान करण्यात आला.

व्यासपीठावर तसेच कार्यक्रमासाठी विशेष मान्यवर उपस्थित राहिल्याने संपुर्ण कार्यक्रम अत्यंत बहारदार ठरला. संस्थेचे पदाधिकारी श्री नारायण नावती, श्री सदानंद कुवेलकर, श्री सचिन रेगे, श्री प्रशांत कसबेकर, ॲड. संतोष देसाई, श्री गोविंद ज्योत्तकर ,श्री संजय घाटे अशा महनीय व्यक्ती केवळ गुरुकुलच्या बद्दलच्या प्रेमापोटी आवर्जुन उपस्थित राहिले.

या भव्य कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन हे कु.सलोनी वाडीकर व कु. अपूर्वा मातोडे यांनी केले. सुत्रसंचालन कु. अपूर्वा माताडे यानी केले. तर कु. सलोनी वाडीकर यांनी शेवटी आभार मानले.