ओरोस / प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची 6000 कोटींचा व्यवसायाचा टप्पा गाठण्याकडे वाटचाल सुरू आहे, बँकेने आपली शेतकऱ्यांची बँक या ओळखीबरोबरच आता डिजिटल जिल्हा बँक अशी नवीन ओळख निर्माण केली आहे, जिल्हा बँकेने जिल्ह्यातील सर्व घटकांचा विचार करून विविध योजनांद्वारे उत्तम उत्तम बँकिंग सेवा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. धवल क्रांतीचा ध्यास घेत गोकुळच्या माध्यमातून दूध संकलन तसेच दुग्ध संस्थांना जलद गतीने व सुलभतेने कर्जपुरवठा करत जिल्ह्यातील दूध उत्पादन वाढीवर जिल्हा बँकेकडून भर देण्यात आला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी बँकेत खाते उघडून खाते आधार लिंक करून देण्याचे काम बँकेने सुरू केला आहे अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीषा दळवी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ४१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सिंधुदुर्गनगरी येथे शरद कृषी भवन येथे खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली झाली. सभेनंतर जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर, संचालक व्हिक्टर डांन्टस, गजानन गावडे, संदिप परब, गणपत देसाई, अॅड. प्रकाश बोडस, रवींद्र मडगावकर, समीर सावंत, मेघनाद धुरी, प्रज्ञा ढवण आदी संचालक उपस्थित होते.
जिल्हा बँकेने चार दशकात आपली यशस्वी वाटचाल पूर्ण करत असतांना दिनांक १७ जुलै २०२४ अखेर बँकेने रु. ५७६७ कोटी व्यवसायाचा टप्पा गाठलेला असून चालू आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये रु. ५५२.८० कोटी एवढी व्यवसाय वाढ झालेली आहे. आणि बँकेची रु. ६००० कोटींचा व्यवसायाचा टप्पा गाठण्याकडे वाटचाल सुरू आहे. बँकेने ‘आपली शेतकऱ्यांची बँक’ या ओळखीबरोबरच आता ‘डिजिटल जिल्हा बँक’ अशी आपली नवीन ओळख निर्माण केली आहे. जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे मोठे उद्योग, व्यवसाय नसतानाही बँकेने सर्वांगीण प्रगती केलेली आहे.
सन २०२३-२४ या आर्थिक वर्षांमध्ये बँकेला रु. ३६९.८७ कोटींच्या नवीन ठेवी प्राप्त होऊन बँकेच्या एकूण रु. २९७२.७९ कोटी एवढ्या झालेल्या असून ठेवींच्या वाढीचे प्रमाण १४.२१% एवढे आहे. बँकेच्या कर्ज व्यवहारांमध्ये रु. १८२.९३ कोटीची वाढ होऊन एकूण कर्ज रुपये २४१८.१० कोटी एवढी झालेली आहे. बँकेच्या एकूण निधीमध्ये रु. ७८.५० कोटींची वाढ झालेली आहे व एकूण निधी रु. ४३४.४२ कोटी एवढा झालेला आहे. तसेच बँकेचा ढोबळ नफा रु. १००.५९ कोटी एवढा झालेला असून आवश्यक सर्व तरतुदीनंतर बँकेचा निव्वळ नफा रु. २६ कोटी एवढा झालेला आहे. चालू वर्षी बँकेच्या ढोबळ एन.पी.ए. प्रमाणामध्ये ०.०४ टक्के एवढी घट झाली असून बँकेच्या ढोबळ एन.पी.ए.चे प्रमाण ३.५२% तर निव्वळ एन.पी.ए.चे प्रमाण शुन्य टक्के आहे. बँकेच्या भांडवल पर्याप्ततेचे प्रमाण (CRAR) ११.०५% एवढे असून विविध आर्थिक निकषांची पूर्तता नियमित करून याही वर्षी बँकेस वैधानिक लेखापरीक्षणामध्ये ऑडिट वर्ग ‘अ’ मिळालेला आहे. या सर्व यशामध्ये जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष, सर्व संचालक मंडळ, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी व कर्मचारी वर्गाचा सहभाग आहे असे जिल्हा बँक अध्यक्ष श्री. मनिष दळवी यांनी स्पष्ट केले.
यावर्षी बँकेने मिळविलेला नफा राबविलेल्या विविध योजना केलेला व्यवसाय इत्यादीसाठी सभासदांमधून अभिनंदनचे ठराव घेण्यात आले , यशस्वीतेमध्ये बँकेच्या सभासद संस्था, ठेवीदार कर्जदार ग्राहक व जिल्हा वासीयांचा मोठा वाटा राहिला आहे, याबद्दल जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी आभार व्यक्त केले.