पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांची माहिती…
निलेश जोशी / कुडाळ :- कुडाळ शहरातील खरेदी – विक्री संघाच्या आवारात असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम फोडीतील फरार दोन संशयितांच्या मागावर कुडाळ पोलिस व स्थानिक गुन्हा अन्वेषनची पथके आहेत. या दोन्ही आरोपींना लवकरच गजाआड केले जाईल. फरार आरोपींचे मोबाईल बंद असल्यामुळे तपासात काही अडचणी येत आहेत. तरी सुध्दा लवकरच दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या जातील असा विश्वास तपासी अधिकारी तथा कुडाळ निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी व्यक्त केला. दरम्यान पोलिस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी सोमवारी कुडाळ पोलिस स्थानकाला भेट देत याबाबत माहिती घेतली. दरम्यान या गुन्हेगारांनी रायगड आणि नायगाव येथे सुद्धा अशीच चोरी केल्याचे तपासात उघड झाले आहे.
रविवारी पहाटे कुडाळ खरेदी विक्री संघानजिकचे एटीएम फोडून चोरट्यांनी पोलिसांनाच आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता मात्र बँकेच्या हायटेक सुरक्षा यंत्रणेमूळे संशयित चोरट्यांपैकी अनिल अम्मीलाल बलोदा व वारीस जफरूद्दीन खान याला पोलिसांनी पकडले. तरी पण अन्य दोन संशयित इस्टिलो कार गाडीसह पळून गेले. त्यांच्या मागावर पोलिस आहेत. कुडाळ खरेदी विक्री संघाकडील एटीएम फोडीतील चोरीत संशयितांनी वापरलेली इस्टिलो कार ही मुंबई- डोंबिवली स्थित गाडी मालक प्रसाद पाटील यांच्या नावे आहे. ती कार श्री. पाटील यांनी आपल्या भावोजीला दुरूस्त करून विकण्यास सांगितली होती. श्री. पाटील यांच्या भावोजीने सदर गाडी दुरूस्त करून कार -24 ला विकली. कार 24 ने ठाणे जिल्ह्यातील शिळफाटा येथील एस. के. डिर्लर याला विकली. त्या एस.के. डिर्लरने ती कार एटीएम फोडून पळुन गेलेल्या महम्मद शमशहा याला विकली होती. परंतु चोरीतील गाडी अद्यापही ट्रान्सफर न झाल्याने मुळ मालक प्रसाद पाटील यांच्याच नावे दिसत आहे. रायगड मध्ये सुध्दा 15 जून 2024 रोजी अशाच प्रकारचा एटीएम फोडीचा गुन्हा घडला होता. त्या गुन्ह्यात सुध्दा याच गाडीचा वापर झाला होता. मात्र त्यावेळी सदर गाडीचा नंबर वेगळा होता.
कुडाळ येथील एटीएम फोडीत दोघा पैकी एका चोरट्याला पोलिसांनी जाग्यावरच पकडले होते. तर दुसरा चोरटा एटीएम मधील पैशाचे तीन ट्रे घेवून पळत सुटला त्याच्या हातातील दोन ट्रे खाली पडले व एक ट्रे घेवून तो अंधारातून पळत गेला. कुडाळ एसआरएम कॉलेज जवळील सुरभी अपार्टमेंटच्या खाली मेघा जाधव यांची सायकल होती. त्या सायकलला कुलूप नसल्याने ती सायकल चोरटा घेवून हायवेने पणदूरच्या दिशेने मागे पैशाची ट्रे बांधून जात होता. पोलिसांनी त्याला पहाटे ताब्यात घेतले. दरम्यान सायकल चोरी प्रकरणी मेघा जाधव यांनी संशयिता विरोधात फिर्याद दिली आहे.
अशाच प्रकारचा गुन्हा रायगड- वडखळ मध्ये घडला असुन त्या गुन्ह्यात 16 लाख 51 हजार रूपयाची रक्कम गेली आहे. मिराभाईंदर नायगाव मध्ये सुध्दा अशाचप्रकारचा गुन्हा घडला असुन त्यामध्ये 4 लाख 29 हजार रूपयाची रक्कम चोरीस गेली आहे. एकुणच मिराभाईंदर, रायगड वडखळ व कुडाळ मधील चोरट्यांचे लक्ष एटीएम सेंटरच आहे. त्यामुळे या तिन्ही चोरीत संशयित चोरटेच असल्याचे तपासात पुढे येत आहे.एटीएम फोडीतील मुख्य आरोपी वारीस खान हा राजस्थान जेएफसी फोर्ट मधील असुन त्याला दि.19 जुलै 2021 ला चोरीच्या गुन्ह्यात शिक्षा झाली आहे. दरम्यान फरार आरोपीच्या मुसक्या लवकरच आवळल्या जातील असा विश्वास श्री. मगदूम यांनी व्यक्त केला आहे.