येत्या पाच दिवसात तळेरे दशक्रोशीतील बीएसएनएल सेवा सुरळीत न झाल्यास आंदोलन – संजय नकाशे…

72

कणकवली / प्रतिनिधी :- गेली वर्षभर तळेरे दशक्रोशीत बीएसएनएल सेवा ठप्प असून लाईट नसेल तर मोबाईलची रेंज गायब होत असल्याने नागरीकांकडून रोष व्यक्त केला जात आहे.याबाबत सामाजिक कार्यकर्ते तथा कासार्डे तंटामुक्त अध्यक्ष संजय नकाशे अधिका-यांना धारेवर धरत येत्या पाच दिवसात तळेरे दशक्रोशीतील बीएसएनएल सेवा सुरळीत न झाल्यास आंदोलनाचा ईशारा दिला आहे.

गेली अनेक दिवस तळेरे येथे असणारा बीएसएनएल टाॅवर लाईट नसल्याने रेंज गायब होत असल्याने बीएसएनएल ग्राहकांचे फोन नाॅट रिचेबल होत आहे.तसेच येथील तळेरे बीएसएनएल कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने याचा फटका ग्राहकांना बसत आहे.सध्या पावसाळ्यात सतत वीज पुरवठा खंडित होत असल्याने बीएसएनएल सेवा तळेरेसह कासार्डे, दारूम, ओझरम, पियाळी, वारगाव, साळिस्ते भागात कोलमडली आहे.

यामुळे बीएसएनएल ग्राहक खाजगी कंपन्यांकडे वळू लागले आहेत. मात्र सध्या खाजगी कंपन्यांचे मोबाईल रिचार्ज दर भडकल्याने सर्व सामान्य नागरीकांना बीएसएनएल सेवा परवडते मात्र बीएसएनएल सेवा ठप्प असल्याने नागरीक मेटाकुटीस आले आहेत.याबाबत कणकवली कार्यालय येथे संजय नकाशे याच्या राकेश मुणगेकर, अजित गायकवाड, रविंद्र तेलि यानी धडक देत जाब विचारला.

मात्र अधिकारी कोणीही न मिळाल्याने बीएसएनएलचे उपमहाप्रबंधक आर.वी.जाणू यांच्याशी संपर्क साधून येथील अधिकारी फोन उचलत नाहीत, कायम तळेरे परिसरात सेवा ठप्प होते असे सांगत गेली वर्षभर अशाच समस्यांचा पाढा वाचला चर्चेअंती पुढील पाच दिवसात तळेरे दशक्रोशीतील सेवा सुरळीत करण्याचे आश्वासन देण्यात आले. यावेळेस सेवा सुरळीत न झाल्यास आंदोलन करणार असल्याचे संजय नकाशे यानी सांगितले.