३७ रक्तदात्यानी केले रक्तदान…
राष्ट्रीय ऐच्छिक रक्तदान दिनाचे औचित्य…
निलेश जोशी / कुडाळ :- पिंगुळी-गोंधयाळे येथील मदरसा फलाह-ए-उम्मत येथे आज राष्ट्रीय ऐच्छिक रक्तदान दिनाच्या निमित्ताने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळी ९ ते १ वाजेपर्यंत चाललेल्या या रक्तदान शिबीरात एकुण ३७ रक्तदात्यानी रक्तदान केले. सर्वधर्मीय रक्तदात्यानी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आयोजकांचे मनोधैर्य उंचावले.
माजी नगरसेवक एजाज नाईक हे सिंधुदुर्ग मिल्लत फाऊंडेशनच्या सहकार्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध ठिकाणी मस्जिद, मदरसा, दर्गाह आणि इतर धार्मिक व सामाजिक संस्थांच्या माध्यमातून रक्तदानाविषयी जागरूकता पसरविण्यासाठी रक्तदान शिबिरांचे आयोजन करत आहेत. दिनांक २८ सप्टेंबर रोजी सावंतवाडी येथील मुस्लिम वेल्फेअर सोसायटीच्या कादरी मस्जिद मध्ये झालेल्या रक्तदान शिबीरात ३९ रक्तदात्यानी रक्तदान केले होते.
या रक्तदान शिबीराचे उद्घाटन कुडाळचे पोलीस उपनिरीक्षक श्री. पालवे साहेब यांनी फीत कापून केले. यावेळी कुडाळ पोलीस ठाण्याचे अधिकारी रुपेश सारंग, सिंधू रक्तमीत्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश तेंडुलकर, कुडाळचे माजी नगरसेवक. एजाज नाईक, सावंतवाडी रक्तपेढीचे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. आजच्या रक्तदान शिबीराला एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष मोहन होडावडेकर, संत राउळ महाराज कॉलेजचे प्राध्यापक डॉ. अर्षद हुसेन आवटे, वाडीवरवडे गावचे माजी सरपंच अमेय धुरी, आदीनी भेट देत रक्तदान शिबीराचे आयोजन केल्या बद्दल मदरसा कमिटीचे कौतूक केले.
यावेळी बोलताना एजाज नाईक यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध ठिकाणी अश्या स्वरूपाचे १२ रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्याचे नियोजन असल्याचे सांगितले. तसेच राखीव रक्तदात्यांची सुची बनवून आवश्यकतेनुसार राखीव रक्तदाते उपलब्ध केले जातील असे सांगितले. प्रकाश तेंडुलकर यांनी उपस्थिताना सदैव ऐच्छिक रक्तदान करण्यासाठी शपथ दिली.
सर्व रक्तदात्यांचे आणि रक्तपेढीच्या कर्मचा-यांचे मदरसा संस्थेच्या वतीने संस्था अध्यक्ष मुश्ताक शेख, हाफीज नाझीम यांनी आभार व्यक्त केले आणि दरवर्षी रक्तदान शिबीर आयोजित करण्याचा मानस व्यक्त केला. मुस्लिम समाजात रक्तदानासाठी जागरूकता निर्माण होण्यासाठी आणि रक्तदान शिबीरांच्या आयोजनासाठी करत असलेल्या अविरत प्रयत्नांसाठी कुडाळचे माजी नगरसेवक एजाज नाईक यांचा यावेळी हृद्य सत्कार करण्यात आला.