उद्या प्रचाराचा नारळ फोडणार – अपक्ष उमेदवार सौ. अर्चना घारे…

58

निशाणी पाकीट प्रत्येक घरोघरी पोहोचेल… 

राजू तावडे / सावंतवाडी :- उद्या मंगळवारी सकाळी भालावल येथे माझ्या ग्रामदेवतेच्या पायी नतमस्तक होवून मी प्रचाराचा नारळ फोडणार आहे. मी माघार घेणार नाही असा शब्द अर्ज भरताना दिला होता. कोणत्याही परिस्थितीत मी माघार घेणार नाही यावर मी ठाम राहिले. मन विचलित होऊ दिले नाही. मी मतदार संघातील जनतेला दिलेल्या शब्दाला जागले याचे मला समाधान आहे. वृद्धांनी थरथरत्या हातांनी माझ्या पाठीवर ठेवून दिलेले आशीर्वाद लाख मोलाचे आहे. मी लढणार आणि जिंकणार आहे, असे प्रतिपादन सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सौ. अर्चना घारे यांनी आज सावंतवाडी येथे पत्रकार परिषदेत बोलताना केले. यावेळी पुंडलिक दळवी, देवा टेमकर, हिदायतुल्ला खान, रीतिक परब, विवेक गवस, श्री.संजय भाईप यांसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

मला लिफाफा( पाकीट ) ही निशाणी मिळाली असून, हे पाकीट प्रत्येक घरोघरी पोहोचेल, पाकीट वजनदार असणार आहे असे सांगून सौ. अर्चना घारे म्हणाल्या २०१९ ला मला पक्षाने ऐनवेळी माघार घ्यायला लावली. पण मी कामे करीत राहिले. पक्षाने मला कामाला लाग असे सांगितले होते. एबी फाॅर्म तुमच्या घरी पोच होईल असे वचन दिले होते. महाविकास आघाडी मुळे मला उमेदवारी मिळाली नाही. शेवटी निर्णय माझ्या विरोधात गेला, तरी मी कोणावरही नाराज नाही. पक्षाने माझ्यासाठी एवढे केले म्हणून मी आज इथपर्यंत आले असे सौ. घारे म्हणाल्या. जनतेचे माझ्यावर प्रचंड प्रेम आहे. मी अपक्ष नाही. मी जनतेची उमेदवार आहे. जनता व मतदार संघातील महिला पदर खोचून माझ्यासोबत आहेत. त्यामुळे माझ्या विजय नक्कीच आहे असे सौ. घारे म्हणाल्या.