राजू तावडे / सावंतवाडी :- कार्यकर्त्यांना बळ देऊ शकेल ते सर्वसामान्य नेतृत्व म्हणजे राजन तेली. कोणताही सर्वसामान्य माणूस हा राजन तेली यांना थेट भेटू शकतो. कोणतीही मध्यस्थी न करता आपल्या कार्यकर्त्यांची अनेक कामे आज पर्यंत राजन तेली यांनी केली आहेत. काम करताना त्यांनी कधी कधी पक्षही बघितला नाही, असे प्रतिपादन सावंतवाडीचे माजी नगरसेवक उमेश कोरगांवकर यांनी केले. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उबाठा शिवसेनेचे अधिकृत उमेदवार राजन तेली यांच्या प्रचारासाठी आज चराठा येथे जाहीर सभेचे आयोजन केले होते. या सभेत कोरगावकर बोलत होते. सावंतवाडी मतदारसंघाचा विकास करण्यासाठी राजन तेली यांना प्रचंड मताने विजयी करा, असे आवाहन कोरगावकर यांनी यावेळी केले.
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, शिवसेना विधानसभा अध्यक्ष रुपेश राऊळ, शिवसेना तालुकाप्रमुख मायकल डिसोझा, माजी जिल्हाप्रमुख रमेश गावकर, विभाग प्रमुख सुनील गावडे, विनोद ठाकूर, माजी उपसभापती विश्राम जाधव, बाळू परब, विश्राम कांबळी व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.