राजू तावडे / सावंतवाडी :- आगामी सावंतवाडी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सर्व पर्याय खुले असून कोणीही मनसेला यापुढे गृहीत धरू नये असा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर यांनी दिला. पक्षातर्फे शहरी व ग्रामीण भागात चाचपणी करण्यात येत असून सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना विश्वासात घेवून मनसे पक्षाच्या भविष्यातील राजकीय वाटचालीचा विचार करून वरिष्ठ पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो निर्णय घेण्यात येणार आहॆ असे ॲड. अनिल केसरकर यांनी स्पष्ट केले.
लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी महायुतीचे काम करून नारायण राणे यांना विजयी करण्यासाठी योगदान दिले होते. मात्र आता विधानसभा निवडणुकीत मनसेला कोणीही गृहीत धरू नये. मागील अनेक वर्ष जनतेचे प्रलंबित असलेले रोजगार, आरोग्य, पाणी, चांगले रस्ते व इतर मूलभूत सुविधा या प्रश्नांची सोडवणूक करण्यात सत्ताधारी पूर्णपणे अपयशी ठरलेले आहेत. केवळ हवेतील आश्वासने देण्यापलीकडे कोणीही जनतेसाठी काम केलेल नाही. त्या मुळे लोकांमध्ये असलेला रोष विचारात घेता या पुढे जो उमेदवार खरोखर रोजगार वा आरोग्य या महत्वाच्या प्रश्नांना प्राधान्य देईल, त्याच्याच पाठीमागे सावंतवाडी विधानसभा मतदार संघात मनसेची पूर्ण ताकत उभी करण्यात येईल, मात्र तत्पूर्वी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मते जाणून घेतली जातील असे अनिल केसरकर म्हणाले.