आनंदवाडी ‘डे-नाईट क्रिकेट चॅम्पियन ट्रॉफी’ १ जानेवारीपासून….

88

देवगड / प्रतिनिधी :- आनंदवाडी ग्रामस्थ मंडळ आणि आनंदवाडी क्रिकेट क्लबच्यावतीने आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफी डे-नाईट टेनिस बॉल क्रिकेट प्रिमियर लीग स्पर्धा १ ते ५ जानेवारी या कालावधीत देवगड येथे होणार आहे. स्पर्धेतील विजेत्या संघाला ३ लाख ३३ हजार ३३३ रुपये व आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफी, उपविजेत्यास १ लाख ५५ हजार ५५५ रुपये व ट्रॉफी देण्यात येणार आहे. प्रथम नावनोंदणी करणाऱ्या १६ संघांना स्पर्धेत प्रवेश दिला जाणार आहे.

स्पर्धेत पश्चिम बंगाल, गुजरात, केरळ, राजस्थान, मध्यप्रदेश, हरियाणा, गोवा, दिल्ली व महाराष्ट्रातील नामवंत खेळाडू सहभागी होणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नावाजलेली व देवगड तालुक्यातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा म्हणून आनंदवाडी क्रिकेट स्पर्धेची ओळख आहे. या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ दी सिरिज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज यांना आकर्षक बक्षिसे तसेच प्रत्येक सामन्यातील सामनावीरास आकर्षक ट्रॉफी देण्यात येणार आहे. स्पर्धेच्या ठिकाणी सुमारे १० हजार प्रेक्षकांसाठी बैठक गॅलरीची व्यवस्था करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेप्रमाणे या स्पर्धेतील खेळाडूंना ‘डीआरएस’ उपलब्ध असणार आहे. या स्पर्धेचे लाईव्ह प्रेक्षपण teniscricket.in वरून होणार आहे.

आयपीएल स्पर्धेतील समालोचक कुणाल दाते (मुंबई), चंदू शेटे (मुंबई), अशोक नाईक (सिंधुदुर्ग) हे स्पर्धेचे समालोचन करणार आहेत. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघातील खेळाडूंची राहण्याची सोय आयोजकांच्यावतीने करण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी १५ डिसेंबरपर्यंत नावनोंदणी करायची असून अधिक माहिती व नावनोंदणीसाठी किशोर कुबल यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.