सावंतवाडी तालुका पत्रकार संघ आयोजित आरोग्य तपासणी शिबिरास पत्रकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

55

राजू तावडे / सावंतवाडी :- सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या वतीने आज सोमवारी आयोजित केलेल्या मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचार शिबिराचा लाभ 25 हून अधिक पत्रकारांनी घेतला. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा वाढला असून या ठिकाणी विविध उपक्रम रुग्णसेवेसाठी सुरू करण्यात आले आहेत ही बाब अत्यंत अभिमानाची असून रुग्ण संख्या वाढत आहे व उपचाराच्या मोड्युलर आय. सी. यु. सारख्या सुविधाही उपलब्ध झाल्या असल्याचे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गिरीश चौगुले यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने जिल्हाध्यक्ष उमेश तोरस्कर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला वसंत केसरकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून नवयुग एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष श्री. उदय भोसले,मराठी पत्रकार परिषद, मुंबईचे माजी राज्य अध्यक्ष गजानन नाईक, सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे सहसचिव श्री. प्रवीण मांजरेकर, उपजिल्हा रुग्णालयाचे स्त्रीरोग तज्ञ डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे तसेच सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार उपस्थित होते.

यावेळी बोलताना कार्यक्रमाचे उद्घाटक उमेश तोरस्कर म्हणाले, सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे काम कौतुकास्पद असून इतर तालुक्यानी त्याचा आदर्श घ्यावा. इतर तालुक्यातही अशा प्रकारचे आरोग्य तपासणी शिबिर घ्यावीत असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी बोलताना वैद्यकीय अधीक्षक चौगुले यांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णांच्या संख्येमध्ये झपाट्याने होत असलेल्या वाढी बद्दल माहिती दिली ते म्हणाले, बाह्य रुग्ण विभागामध्ये एक एप्रिल ते ऑक्टोबर अखेरपर्यंत 49 हजार 911रुग्ण तपासणी तर आंतर रुग्ण विभागांमध्ये 4385 पेशंटांची तपासणी केली असून 742 गर्भवती महिलांची डिलिव्हरी करण्यात आली तसेच शस्त्रक्रिया 474 व अतिगंभीर शस्त्रक्रिया 1217 या रुग्णालयामध्ये करण्यात आल्याचे सांगितले.

प्रास्ताविक तालुकाध्यक्ष हरिश्चंद्र पवार यांनी केले. वैनतेय पत्रकार गृहनिर्माण प्रकल्पाला चालना देण्यासाठी दत्तगुरु डेव्हलपर्सचे श्री. उदय भोसले यांच्यामार्फत वित्तमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन हा प्रकल्प कार्यान्वित करण्याकरिता तालुका पत्रकार संघ प्रयत्न करणार असल्याचे पवार यांनी सांगितले. लवकरच तालुका पत्रकार संघातर्फे विविध स्पर्धा आणि चर्चासत्रांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात नुकतेच रुजू झालेले वैद्यकीय अधीक्षक डॉ. गिरीश चौगुले, सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल उमेश तोरस्कर, पत्रकारांच्या विविध कार्यक्रमांना प्रोत्साहित करणारे श्री. उदय भोसले, सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या सहकार्यवाहपदी निवड झालेले प्रवीण मांजरेकर, गेली 25 वर्षाहून अधिक काळ स्त्रीरोग तज्ञ म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात सेवा देणारे स्त्रीरोगतज्ञ डॉ.ज्ञानेश्वर ऐवळे यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण मांजरेकर व मोहन जाधव यांनी केले तर आभार पत्रकार संघाचे सचिव मयूर चराटकर यानी मानले. याप्रसंगी सचिव मयूर चराटकर, खजिनदार रामचंद्र कुडाळकर, मंगल कामत, दिव्या वायंगणकर, विजय राऊत, गुरु पेडणेकर, नरेंद्र देशपांडे, हर्षवर्धन धारणकर, मोहन जाधव, विश्वनाथ नाईक, अर्जुन राऊळ, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर, प्रसन्न गोंदावळे, जीवन रक्षा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर, गुरुदत्त कामत आदी उपस्थित होते.