अवघ्या तीन तासांत गोव्यात जाता येणार आहे-संकेश्वर ते बांदा मार्गाचा ‘डीपीआर’ करावा

5

कोल्हापूर : कोकणला आणखी नजीक आणण्यासाठी संकेश्वर ते बांदा १०६ किलोमीटर अंतराच्या नव्या राष्टय महामार्गाचा ‘डीपीआर’(विकास आराखडा) करण्याचे आदेश राष्टÑीय रस्ते विकास महामंडळाने दिले आहेत. त्याचा ‘डीपीआर’ भारतीय राजमार्ग प्राधिकरणामार्फत करण्यात येणार आहे. कोकणकडील व्यापाराला चालना मिळावी, परराज्यातून, तसेच मुंबई-पुणे मार्गे येणाऱ्या पर्यटकांना या महामार्गातून गोव्याकडे जाता यावे; यासाठी या नव्या राष्ट्रीय महामार्गाची निर्मिती करण्यात येत आहे.

सध्याच्या स्थितीत तवंदी घाट, शिपूर, आजरामार्गे गोवा अशी वाहतूक सुरू आहे. या मार्गावर वाहनांची प्रचंड संख्या आहे; पण रस्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे पर्यटकांसह वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे नव्याने होणारा हा राष्टÑीय महामार्ग पर्यटकांच्या आणि वाहनचालकांच्या सोईचा होणार आहे. हा ‘डीपीआर’ करताना मार्र्गावरील वाहतुकीची संख्या, मार्गासाठीचा अपेक्षित खर्च, भूसंपादनाची प्रक्रिया, जमीनधारकांना द्यावा लागणारा योग्य मोबदला, याचाही विचार होणार आहे. हा ‘डीपीआर’ तयार करून तो मंत्रालयाकडे पाठविण्यात येणार आहे.

चौपदरीकरण की सहापदरीकरण?
परिसरातील जुन्या मार्गावरून ये-जा करणाºया वाहनांच्या संख्येवरून हा नवा महामार्ग चौपदरीकरण की सहापदरीकरण करायचा हे विकास आराखड्यामध्ये निश्चित करण्यात येणार आहे.

कोकण व्यापाराला चालना
सध्याच्या स्थितीत दळणवळणाच्या दृष्टीने कोकणशी अनेक राज्यांचा संपर्क वाढला आहे. कोकणकडील व्यापाराला या नव्या महामार्गामुळे चालना मिळणार आहे. त्याचा महाराष्टÑ, कर्नाटकसह इतर राज्यांना फायदा होणार आहे.