आवाजासाठी साधना महत्वाची : सावंतवाडीत श्रीनिवास नार्वेकर यांचे मार्गदर्शन
प्रतिनिधी / सावंतवाडी:
आवाजावर हुकूमत मिळवायची असेल तर साधना महत्वाची आहे. आपलं बोलणं त्रयस्थ कानांनी ऐकता आलं पाहिजे. आवाज आणि देहबोली ही फार मोठी संपत्ती आहे. आणि त्या जोरावर तुम्ही जगावर राज्य करू शकता, असे प्रतिपादन व्हिजन मुंबईचे संचालक आणि आवाजतज्ञ श्रीनिवास नार्वेकर यांनी केले.
टुडे करिअर अकॅडमी, मुक्ताई अकॅडमी आणि व्हिजन मुंबई यांच्या संयुक्त विद्यामाने येथील श्रीराम वाचन मंदिरच्या सभागृहात आवाज आणि देहबोलीवर आयोजित मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कवयित्री, लेखिका स्वरुपा सामंत, आजगाव डी. एड. कॉलेजचे प्रा. रुपेश पाटील, राजेश मोंडकर, कौस्तुभ पेडणेकर आदी उपस्थित होते.
नार्वेकर म्हणाले, आवाज घडवता येणे शक्य आहे. पण त्यासाठी मेहनतीला पर्याय नाही. सातत्याने शिकण्याची प्रवृत्ती हवी. तुम्ही स्वत: उत्तम बोलण्याचा
प्रयत्न करा. इतरांचे आवाज ऐका. त्यातील त्रुटी शोधा. त्यातूनही तुमचे शिक्षण होत जाईल. आज जे नेते उत्तम बोलत आहेत, त्यांचा सुरुवातीचा काळ, सुरुवातीची भाषणे अभ्यासा. त्यावेळी तेदेखील अडखळतच होते. मात्र, त्यातून ते शिकत गेले.
आवाजावर हुकूमत मिळवायची असेल तर साधनेशिवाय पर्याय नाही. साधना करायची तर सातत्य हवे. स्वत:कडे तटस्थपणे पाहायला हवे. आपलं बोलणं त्रयस्थ कानांनी ऐकता आलं पाहिजे. ते कठीण आहे, मात्र अशक्य नाही. तरच स्वत:च्या चुका समजून येतील. त्यातून तुम्हाला सुधारण्याची संधी मिळेल. स्वत:मध्ये प्रगती घडवायची असेल तर या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. तुमच्याकडे खूप ज्ञान आहे. पण ते सादर करण्याची शैली नसेल तर तुम्ही प्रभाव टाकू शकणार नाही. त्यामुळे सादरीकरणाची शैली महत्वाची आहे, असेही नार्वेकर म्हणाले.
यावेळी प्रा. रुपेश पाटील, स्वरुपा सामंत यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेश मोंडकर यांनी तर स्वागत आणि आभारप्रदर्शन कौस्तुभ पेडणेकर यांनी केले.