मालवण येथे मुक्त विद्यापीठाचा पदवी प्रदान समारंभ
वार्ताहर / मालवण:
आजच्या विद्यार्थ्यांमध्ये केवळ गुण मिळविण्याची स्पर्धा दिसून येते. परीक्षेमध्ये गुण मिळविण्याबरोबरच मुलांमधील कौशल्याचा विकास होणे आवश्यक आहे. जोपर्यंत शिकणे व जगणे एकत्र येत नाही, तोपर्यंत विद्यार्थ्यांचा विकास होणार नाही, असे प्रतिपादन मुक्त विद्यापीठाचे विभागीय संचालक प्रा. दादासाहेब मोरे यांनी येथे केले.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध शिक्षणक्रमांना प्रवेश घेऊन पदव्युत्तर पदवी, पदवी, पदविका अभ्यासक्रम पूर्ण करणाऱया जिल्हय़ातील विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ येथील स. का. पाटील महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रा. दादासाहेब मोरे बोलत होते. प्राचार्य डॉ. श्रीरंग मंडले, प्रा. देविदास हारगिले, डॉ. एम. बी. चौगुले, डॉ. तुषार वेंगुर्लेकर आदी उपस्थित होते.
मोरे म्हणाले, गेल्या वर्षीपासून यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा पदवी प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम जिल्हानिहाय घेतला जात आहे. प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेऊन पदवी प्राप्त करणाऱया विद्यार्थ्यांसाठी पदवीदान सोहळा हा आनंदाचा क्षण असतो. मुक्त विद्यापीठाची पुस्तके ही अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरत आहेत. स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी मुक्त विद्यापीठांच्या पुस्तकांचा संदर्भ म्हणून वापर करतात. मुलांमधील कौशल्याचा विकास व्हावा, या दृष्टीने मुक्त विद्यापीठांच्या पुस्तकांची निर्मिती केलेली असते. डॉ. एम. बी. चौगुले, प्राचार्य डॉ. श्रीरंग मंडले यांनी मनोगते व्यक्त केली. प्रास्ताविक प्रा. देविदास हारगिले यांनी केले. सुत्रसंचालन एच. एम. चौगले, प्रा. कैलास राबते, प्रा. हसन खान यांनी केले.