भाजपाकडून ‘गरज सरो वैद्य मरो’चा दुसरा अंक सुरु : शिवसेना

13

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत यश मिळाल्यावर गरज सरो आणि वैद्य मरो या म्हणीचा दुसरा अंक सुरु झाला आहे. २०१४ मध्ये भाजपाने शिवसेनेसोबतची युती तोडली. २०१९ ला लोकसभा निवडणुकीच्या आधी युती केली मात्र आता गरज सरो आणि वैद्य मरोचा दुसरा अंक सुरु झाला आहे. पण इथे वैद्य मरणार नाही. त्याच्या जिभेखाली संजीवनी गुटिका आहे. ही संजीवनी म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेचा आशीर्वाद आहे. अशा शब्दात शिवसेनेने भाजपाला फटकारले आहे. मुख्यमंत्री कोण होणार हा पेच सध्या महाराष्ट्रापुढे आहे कारण शिवसेनेने मुख्यमंत्रीपदामध्ये अर्धा वाटा मागितला आहे. त्यामुळे सामनाच्या अग्रलेखातून भाजपाला खुमासदार शैलीत चिमटे काढण्यात आले आहेत.

काय म्हटले आहे अग्रलेखात?
महाराष्ट्राच्या राजकारणास चार दिशा आणि चार पाय फुटले आहेत. राज्याच्या हितासाठी हे बरे नाही. २४ तारखेला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. पण ३०-३१ तारीख उलटून गेली तरी सरकार स्थापनेच्या हालचाली नाहीत. युतीला जनादेश मिळूनही अधांतरी वातावरण निर्माण झाले आहे. या काळात काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी या पक्षांनी आपापल्या पक्षाचा विधीमंडळ नेता निवडला आहे. पण देशाचे लक्ष लागले आहे ते शिवसेना-भाजपा युतीचे काय होते? सत्तापदांचे समान वाटप हा दोन पक्षांतील कळीचा मुद्दा आहे. कळ लावण्याचे तसे काही कारण नव्हते, पण कळ लागली आहे. युती किंवा आघाड्यांमध्ये कोणी किती जागा जिंकल्या यापेक्षाही महत्त्वाचा असतो परस्परांमध्ये झालेला सत्तावाटपाचा करार. निवडणूक लढवताना तो पाळला पाहिजे आणि निकालानंतरही हा करार दोन्ही बाजूंनी पाळणे तितकेच महत्त्वाचे आणि विश्वासार्हतेचे असते. शिवसेनेची मागणी आहे ती एवढीच. युतीच्या वाती पेटवताना विश्वासाचे तेल समईत ओतले. ते तेल नव्हे गढूळ पाणी होते का? तर अजिबात नाही. सत्तापदाचे समान वाटप हा शब्द मुख्यमंत्र्यांनी जाहीर पत्रकार परिषदेत वापरला व तो सहमतीने वापरला. आता एखाद्या राज्याचे मुख्यमंत्रीपद हे सत्तापदात येत नाही असे कुणाचे म्हणणे असेल तर राज्यशास्त्राचे धडे नव्याने लिहावे लागतील.

२०१४ मध्ये देशात मोदी नेतृत्त्वाखाली भव्य यश मिळताच भाजपाने शिवसेनेसोबतची युती तोडली व २०१९ मध्ये तसेच यश मिळाल्याप्रमाणे गरज सरो आणि वैद्य मरोचा दुसरा अंक सुरु झाला. पण इथे वैद्य मरणार नाही त्याच्या जिभेखाली संजीवनी गुटिका आहे व ही संजीवनी महाराष्ट्राच्या जनतेचा आशीर्वाद आहे. मुख्यमंत्रीपद हे सत्तापद नाही व त्याचे समान वाटप शक्य नसेल असे कुणाला वाटत असेल तर बिनसत्तेच्या पदासाठी देशात इतका आटापिटा का होतो आहे? मुख्यमंत्रीपदाचा किंवा समसमान पदवाटपाचा पेच पडला आहे हे नक्की. मात्र जर सगळे काही आधीच ठरले असेल तर पेच का पडावा?

असे प्रश्न उपस्थित करत आणि भाजपाला कानपिचक्या देत सामनाच्या अग्रलेखातून भाजपाला चिमटे काढण्यात आले आहेत.