पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत आज ‘नियोजन’ सभा

21

सिंधुदुर्गनगरी: जिल्हा नियोजन समितीची सभा 21 जानेवारीला सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आली आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. नूतन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांचीही पहिलीच सभा असल्याने या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सभेत 2020-2021 या पुढील वर्षाचा जिल्हा वार्षिक आराखडा मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची सभा झाली होती. त्यानंतर राज्यात नवे सरकार स्थापन होऊन नवे पालकमंत्री नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जिल्हा नियोजन समितीची सभा होत आहे. दीपक केसरकर पालकमंत्री असताना सभागृहामध्ये खासदार नारायण राणे, आमदार नीतेश राणे यांच्यासह राणे समर्थक नियोजन समिती सदस्य यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध चांगलेच रंगत असे. आताही तसेच शाब्दिक युद्ध रंगणार की सभा खेळीमेळीत पार पडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

2019-20 या वर्षीचा जिल्हा वार्षिक आराखडा 225 कोटीचा आहे. त्यापैकी 134 कोटी रुपयांचा निधी आतापर्यंत प्राप्त होऊन 70 कोटीचा निधी खर्च झाला आहे. आता 2020-21 या पुढील वर्षाचा जिल्हा वार्षिक आराखडा जिल्हा नियोजन समिती सभेमध्ये सादर केला जाणार आहे. हा आराखडा वाढला की कमी झाला, हे सभेमध्ये स्पष्ट होणार आहे. मात्र तो 225 कोटीवरून 250 कोटीवर जाण्याची अधिक शक्यता आहे.