प्रशांत गुळेकर यांची महाराष्ट्र राज्य शासनाच्या वैद्यकीय प्रयोग शाळा समितीवर निवड…

27

 

 

खारेपाटण /प्रतिनिधी:-

 

कणकवली तालुक्यातील खारेपाटण नडगिवे या गावचे रहीवासी व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र प्रशांत गुळेकर यांची महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय प्रयोगशाळा (मेडीकल लॅबरोटरी) व्यवसाया संदर्भात नियंत्रण व नियमन करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या राज्यस्तरीय समितीवर सदस्य म्हणून नुकतीच निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडी बद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे. प्रशांत गुळेकर हे खारेपाटण हायस्कुल चे माजी विद्यार्थी असून त्यांचे पुढील शिक्षण हे (Msc. Microbiology DMLT) पर्यंत झाले आहे. याच बरोबर खारेपाटण तसेच वैभववाडी येथे त्यांचा रक्त, लघवी, थुंकी व आरोग्याशी निगडित तपासणी प्रयोगशाळा व्यवसाय गेली 15 वर्षे सुरू आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य व सामाजिक क्षेत्रात देखील त्यांचे कार्य चालू आहे. महाराष्ट्र राज्यात सध्या १५००० हजार मेडीकल लॅबरोटरीज असून गेली बरीच वर्षें ग्राहकांना सेवा देत आहेत. मात्र या व्यवसायिकांना योग्य मार्गदर्शन तत्वे नसल्याने कायदेशीर अडचणी येत होत्या. ही बाब लक्षात घेऊन सहसंचालक आरोग्य सेवा (रुग्णालये राज्यस्तर) मुंबई यांच्या लेखी आदेशाने वैद्यकीय प्रयोगशाळा संदर्भात मार्गदर्शक तत्त्वे व नियमन तयार करण्यासाठी मेडिकल क्षेत्रातील एकूण १० तज्ञ व्यक्तीची राज्यस्तरीय समिती गठीत करण्यात आली असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रशांत गुळेकर यांची त्यामध्ये निवड झाल्याने जिल्ह्यासाठी ही भूषणावह बाब आहे.