रोटरी क्लब सिंधुदुर्ग सेन्ट्रल अध्यक्षपदी डॉ. प्रशांत कोलते यांची निवड…

11

रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर संग्राम पाटील यांच्या उपस्थितीत पदग्रहण सोहळा व नूतन कार्यकारिणी जाहीर : रोटरी सहयोग पुस्तिकेचे प्रकाशन… 

वैभववाडी /प्रतिनिधी:-

रोटरी क्लब सिंधुदुर्ग सेंट्रल अध्यक्षपदी डॉ.प्रशांत कोलते यांची निवड करण्यात आली आहे. सेक्रेटरी उदय जांभवडेकर,

खजिनदारपदी नविन बांदेकर यांची निवड करण्यात आली आहे.

कसाल येथे रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा रोटरी डिस्ट्रिक्ट 3170 चे गव्हर्नर संग्राम पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला.

क्लबची कार्यकरिणी पुढीलप्रमाणे,

अध्यक्ष डाॅ.प्रशांत कोलते, सेक्रेटरी उदय जांभवडेकर, खजिनदार नविन बांदेकर, सदस्य व्हिक्टर फर्नांडिस, शंकरराव कोकितकर, अरुण मालणकर, इंजि. प्रभाकर सावंत, सत्यवान चव्हाण, इंजि.समीर परब, रामचंद्र घोगळे, डॉ विलास सावंत, अतुल बागवे, इंजि. हेमंत बागवे, इंजि आनंद मसुरकर, रवी डांगी, इंजि. सिद्धांत सावंत, डॉ सिद्धार्थ परब, अभिजित जैतापकर, प्रवीण मोरजकर, फ्रान्सिस फर्नांडिस, डॉ प्रीतम पाटील यांचा समावेश आहे.

गव्हर्नर संग्राम पाटील म्हणाले, ज्या समाजातून आपण येतो, मोठे होते त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो. ते देणे आपण दिले पाहिजे. आणि अश्या समाजकार्यासाठी रोटरी हा एक आंतरराष्ट्रीय पर्याय खूप चांगला आहे. रोटरी इंटरनॅशनल हे जगातील दुसऱ्या नंबरचे मोठे संघटन आहे. आपण यात सहभागी झालात, या माध्यमातून कार्यरत आहात ही गोष्ट तुम्हाला स्वानंद देणारी आणि तुमच्या व्यक्तिगत विकासाची वृद्धी करणारी ठरेल.

या क्लबच्या स्थापने पासून गेल्या चार महिन्यात क्लबने केलेले काम पाहिले तर भविष्यात या क्लबचा मोठा नावलौकिक होईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

रोटरी क्लबच्या स्थापनेला चार महिने पूर्ण झालेत, परंतु कोविडच्या साथीमुळे क्लबचा पदग्रहण सोहळा संपन्न झाला नव्हता. तो मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी व्यासपीठावर श्री. केसरकर, दादा कुरतडकर, प्रणय तेली, सचिन मदने, डॉ. दर्शना कोलते, अभिषेक माने आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी क्लबच्या इतर सर्व सदस्यांना क्लबचे अधिकृत सदस्यत्व बहाल करण्यात आले.

क्लबच्या या पदग्रहण प्रसंगी दोन अवार्ड वितरित करण्यात आली. क्लबचे व्होकेशनल अवार्ड सौ. सुनीता मांजरेकर या महिला नव उद्योजिका यांना देण्यात आले, तर व्होकेशनल एक्सलेन्स अवार्ड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध बिल्डर आणि सामाजिक कार्यकर्ते प्रकाश जैतापकर यांना देण्यात आले. त्याचप्रमाणे काही विशेष व्यक्तींना त्यांच्या अतुलनीय कार्यासाठी सन्मानित करण्यात आले. त्यात कोरोना रुग्णांसाठी घेत असलेल्या परिश्रमासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ श्रीपाद पाटील, डॉ शाम पाटील याना तसेच तौक्ते वादळ संकटानंतर युद्धपातळीवर वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम करणाऱ्या कार्यतत्पर उप अभियंता अमित तारापुरे यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. या सर्व मान्यवरांचा विस्तृत परिचय प्रभाकर सावंत यांनी करून दिला.

यावेळी रोटरी फाऊंडेशन साठी सदस्यांनी रुपये 42 हजारांचा चेक सुपूर्द केला. तसेच क्लबच्या कामाचा आढावा घेणारे ‘रोटरी सहयोग’ हे बुलेटिन मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशित करण्यात आले. जिल्ह्यातील सावंतवाडी, कणकवली, कुडाळ क्लबचे पदाधिकारी आणि सदस्य तसेच समाजातील अनेक मान्यवर नूतन क्लबला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.