कोकण रेल्वेतर्फे गणेशोत्सवासाठी आणखी दोन गाड्या; उद्यापासून आरक्षण होणार सुरु…

12

रत्नागिरी/प्रतिनिधी:-

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वे मार्गावरून अनेक गाड्या आतापर्यंत जाहीर करण्यात आल्या आहेत. पश्चिम रेल्वे मार्गावर राहणाऱ्या चाकरमान्यांसाठी आणखी दोन गाड्यांची घोषणा आज करण्यात आली. वांद्रे-मडगाव-वांद्रे ही विशेष तिकीट दर असलेली पूर्णपणे आरक्षित गाडी मंगळवार, ७ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजून ५५ मिनिटांनी वांद्रे स्थानकातून सुटेल. दुसऱ्या दिवशी, ८ सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता ती मडगावला पोहोचेल. ही गाडी बोरिवली, वसई, पनवेल मार्गे रवाना होईल. गाडीला १८ डबे असतील. ही गाडी बुधवारी, ८ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजता आपला परतीचा प्रवास करेल. दुसरी विशेष गाडी उधना (गुजरात) ते मडगाव आणि परत या मार्गावर धावणार आहे. ही गाडीही विशेष तिकीट दराची आणि पूर्णपणे आरक्षित असेल. उधना येथून ही गाडी गुरुवार, ९ सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजून २५ मिनिटांनी सुटेल. गुजरातमधील नवसारी, वलसाड, वापी, त्यानंतर पालघर जिल्ह्यातील पालघर, वसई मार्गे ही गाडी रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे पोहोचेल. त्यानंतर कोकण रेल्वे मार्गावरून मडगावकडे रवाना होईल. या गाडीला १५ डबे असतील. ही गाडी शुक्रवार, १० सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता परतीच्या प्रवासाला निघेल. या गाड्यांचे आरक्षण उद्यापासून सुरू होणार आहे, अशी माहिती एल के वर्मा मुख्य जनसंपर्क अधिकारी मध्य रेल्वे यांजकडून देण्यात आली आहे.