कणकवली शेतकरी खरेदी – विक्री संघातर्फे संघाच्या कर्मचार्‍यांना निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात येणार – विठ्ठल देसाई…

44

कणकवली/प्रतिनिधी:-

कणकवली तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्यावतीने या महिन्यापासून संघाच्या कर्मचार्‍यांना निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात येणार आहे. कणकवली खरेदी – विक्री संघाला या वर्षी ४९ वर्षे सुरू असल्याने कर्मचारी हिताच्या दृष्टीने हे पाऊल उचलण्यात आले आहे अशी माहिती चेअरमन विठ्ठल देसाई यांनी दिली.

या शेतकरी संघामध्ये सद्यस्थितीत ६० कर्मचारी असून सुमारे ४९ कर्मचाऱ्याना या निवृत्ती वेतन योजनेचा लाभ मिळणार आहे. किमान ४ हजार ते १० हजारापर्यंत निवृत्ती वेतन मिळणार असल्याचे श्री. देसाई यांनी सांगितले. सहकार महर्षी कै. शिवरामभाऊ जाधव आणि कै. मनोहर सावंत यांनी या संघाचा पाया रचला. त्यानंतर केंद्रीयमंत्री नारायण राणे व आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली खरेदी – विक्री संघाची वाटचाल सूरु आहे.

यापूर्वी जिल्हा कृषी औद्योगिक संघाने आणि नुकतेच कुडाळ शेतकरी संघाने त्यांच्या कर्मचार्‍यांसाठी निवृत्ती वेतन योजना लागू केली आहे. आता कणकवली संघानेही आपल्या कर्मचार्‍यांना निवृत्ती वेतन योजना लागू करत निवृत्त कर्मचाऱ्यांना मदतीचा हात देण्याचा हा प्रयत्न केला आहे. या निवृत्ती वेजन योजनेसाठी भविष्य निर्वाह निधी संघटन अंतर्गत कर्मचार्‍यांचे ५० टक्के आणि संघाचे ५० टक्के असे योगदान आहे.

यातून त्या कर्मचार्‍याला निवृत्ती नंतर त्याच्या त्याच्या वेतन ग्रेड प्रमाणे निवृत्ती वेतन मिळणार आहे. तसेच प्राव्हीडंट फंडही त्यांना मिळणार आहे. ज्या कर्मचार्‍यांना निवृत्तीला अजून दहा वर्षाचा कालावधी आहे त्यांना चांगल्या प्रकारे या निवृत्ती वेतन योजनेचा लाभ मिळणार असल्याचे विठ्ठल देसाई यांनी सांगितले.शेतकरी संघाच्या कर्मचार्‍यांना यापूर्वी प्रधानमंत्री विमा योजनेचाही लाभ दिल्याची माहिती त्यांनी दिली.