तब्बल वीस महिन्यांनंतर कार्तिकी यात्रा भरणार…

21

सोलापूर/प्रतिनिधी:-

कोरोनाच्या अनुषंगाने सर्व नियमांचे पालन करत कार्तिकी यात्रा भरवण्यास जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे तब्बल वीस महिन्यांनंतर पंढरपुरात कार्तिकी यात्रा भरणार आहे. 15 नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च 2020 पासून पंढरपुरात कोणतीही यात्रा भरून शकलेली नाही. त्यामुळे पंढरपुरातील अर्थकारण ठप्प झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने शासनाने निर्बंध कमी केले आहेत. अशा परिस्थितीत यंदाची कार्तिकी यात्रा भरण्यासंदर्भात शासन काय भूमिका घेणार, याकडे वारकरी आणि स्थानिक व्यापाऱ्यांचे लक्ष लागले होते. कार्तिकी यात्रा भरवावी, अशी मागणी वारकरी संप्रदायातून आणि व्यापारी वर्गातून होत होती. आमदार प्रशांत परिचारक यांनी देखील यात्रा भरवण्याविषयी पाठपुरावा केला होता. श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समितीने यात्रा भरवण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली होती. प्रांत अधिकारी गजानन गुरव यांनी कोरोना नियमांचे पालन करत यात्रा भरण्यास परवानगी मिळावी, अशा आशयाचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे पाठवला होता. या सर्वांची दखल घेऊन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मिलिंद शंभरकर यांनी यांनी यात्रेच्या अनुषंगाने कोणकोणती दक्षता घेतली जावी, या संदर्भात सविस्तर आदेश पारित केले आहेत.