खारेपाटण येथे महिला आरोग्य तपासणी शिबीर संपन्न; “महिला आरोग्य दृष्ट्या सक्षम असणे काळाची गरज” – डॉ. वैशाली गोंडाने…

8

कणकवली/प्रतिनिधी:-

“आज देशातील ग्रामीण भागातील महिलांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. किंबहुना त्याचा परिणाम आपल्या कौटुंबिक स्वास्थ्यावर होत आहे. याकरिता समाजाचा व कुटुंबाचा आरोग्याचा पाया जर भक्कम करायचा असेल तर महिला आरोग्य दृष्ट्या सक्षम असणे काळाची गरज आहे.” असे प्रतिपादन मुंबई केईएम हॉस्पिटलच्या सहाय्यक अधिक्षक डॉ.वैशाली गोंडाने यांनी खारेपाटण येथील महिला आरोग्य तपासणी शिबिरात मार्गदर्शन करताना केले.

खारेपाटण ग्रामपंचायत व खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्र खारेपाटण तसेच मैत्रेय महिला ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून खारेपाटण हायस्कुल येथे नुकतेच ३० वर्षांवरील महिलांच्या आरोग्याचे तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत यांच्या हस्ते करण्यात आले होते. यावेळी मुंबई केईएम हॉस्पिटलच्या सहाय्यक अधीक्षक डॉ.वैशाली गोंडाने या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. तर खारेपाटण ग्रामपंचायत सदस्या अंजली कुबल, रीना ब्रम्हदंडे, उज्वला चिके, आरती शेट्ये फरहाना सारंग, खारेपाटण प्रा. आ. केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रिया वडाम,डॉ. प्रणव पाटील, खारेपाटण हायस्कुलचे पर्यवेक्षक संजय सानप सर आदी मान्यवर उपस्थित होते.

खारेपाटण हायस्कुल मध्ये संपन्न झालेल्या या आरोग्य शिबिरात महिलांची थायरॉइड तपासणी, शुगर तपासणी, सी बी एस तपासणी, सिरम कॅल्शियम तपासणी, एच बी एस तपासणी आधी विविध तपासण्या करण्यात आल्या. तर एड्स जनजागृती विषयी डॉ.वैशाली गोंडाने यांनी खारेपाटण महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी व उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. सुमारे ५० पेक्षा अधिक ३० वर्षांवरील महिलांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतल्याचे खारेपाटण ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी जि.सी. वेंगुर्लेकर यांनी दिली.