आमदार नितेश राणे यांना मोठा दणका; ४ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी…

5

कणकवली/प्रतिनिधी:-

शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी आमदार नितेश राणे यांना कणकवली न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. ४ फेब्रुवारी पर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

कणकवली कोर्टाबाहेर मोठा पोलीस बदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची पूर्णपणे खबरदारी घेतली जात आहे.कणकवली शहरातील नरडवे फाटा येथे शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला झाला होता. या हल्ल्याचा कट रचणे व कटात सामील असल्याच्या संशयावरून कणकवली पोलिसांत आमदार नितेश राणेंसह अन्य संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर आमदार राणे यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. जिल्हा न्यायालयाने हा अर्ज फेटाळल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात अपील करण्यात आले होते. उच्च न्यायालयानेही त्यांचा जामीन अर्ज फेटाळला.यानंतर राणे यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र सुप्रीम कोर्टानेही त्यांचा जामीन जामीन फेटाळत जिल्हा न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश दिले. यानंतर नितेश राणेंनी न्यायालयासमोर शरणागती पत्करली होती. दरम्यान आज, नितेश राणे यांचा उच्च न्यायालयासमोरील जामीन अर्ज एका निवेदनासह मागे घेतला आहे. या निवेदनात नितेश राणे पोलिसांच्या चौकशीला शरण जाणार असल्याची माहिती दिली आहे.