भजन महर्षी कै. परशुराम पांचाळबुवा यांच्या स्मारकाचे उद्धाटन 15 मे रोजी…

19

वैभववाडी/प्रतिनिधी:-

कुसूर येथे उभारण्यात आलेल्या भजन महर्षी कै. परशुरामबुवा पांचाळ यांच्या स्मारकाचे उद्घाटन तसेच त्यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा रविवार दि. 15 मे रोजी संपन्न होणार आहे. या सोहळ्याला सर्व भजन रसिकांनी व कलावंतांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन भजन महर्षी श्री. पांचाळ स्मारक समिती अध्यक्ष संतोष कानडे यांनी पत्रकार परिषदेत केले आहे. या सोहळ्याला श्रीमती सुजाता श्रीधर सावंत, श्रीमती क्षमा सुरेश कुबल तसेच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

भजन महर्षी पांचाळ बुवा यांचे मुळगाव कुसूर आहे. त्यांच्या मूळ गावातच बुवांचे स्मारक व्हावे असे सर्व शिष्य मंडळी व भजन श्रोत्यांची इच्छा होती. कोरोना काळात या कार्याला थोडा विलंब झाला. परंतु सर्वांच्या सहकार्याने आकर्षक स्मारक या ठिकाणी साकारले आहे. हे स्मारक भविष्यात सामाजिक उपक्रमासाठी देखील खुले असेल. धार्मिक कार्याबरोबरच हे स्मारक गावच्या विकासाचा केंद्रबिंदू ठरेल असा विश्वास संतोष कानडे यांनी व्यक्त केला.

15 मे रोजी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे – सकाळी 6 वा. गणेश पूजन, पुण्याहवाचन, नवग्रह होम, सकाळी 9 वा. परमपूज्य ऊल्हासगिरी महाराज ओणी पाद्यपूजन सोहळा, सकाळी 10 वा. पुतळ्याचे अनावरण, सकाळी 10:30 वा. स्मरणिकेचे प्रकाशन व मान्यवरांचा सत्कार, दुपारी 12 वाजल्यापासून चक्रीभजन, दुपारी 1 वा. स्नेहभोजन, सायंकाळी 6 नंतर कुसुर गावातील व पंचक्रोशीतील स्थानिक भजने, तरी या सोहळ्याला सर्व जिल्ह्यातील भजन रसिक, भजनी बुवा, ग्रामस्थ व कलावंत यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कानडे यांनी केले आहे.