डॉ. विजयकुमार नामदेव शेट्ये यांचा कै. श्री. मुकुंद गणेश दांडेकर पुरस्कार आणि आर. एफ. आर. एस. ॲक्लेमेशन पुरस्कार देवून गौरव…

23

वैभववाडी/प्रतिनिधी:-

डॉ. बाळासाहेब. सावंत. कोकण कृषि विद्यापीठाच्या १८ मे या ५१ व्या वर्धापन दिनी डॉ. विजयकुमार नामदेव शेट्ये यांना कै. श्री. मुकुंद गणेश दांडेकर पुरस्कार आणि आर. एफ. आर. एस. ॲक्लेमेशन पुरस्कार देवून गौरविण्यात आले. डॉ. शेट्ये यांनी कृषि विद्याशाखेमध्ये आणि उद्यानविद्या शाखेमध्ये केलेल्या उत्कृष्ठ कामगिरी व योगदानाबद्दल हे दोन पुरस्कार देवून गौरविण्यात आले.

डॉ. शेट्ये हे नाधवडे गावचे सुपूत्र आहेत. शालेय तसेच महाविद्यालयीन शिक्षणामध्येही त्यांना विविध पुरस्कार आणि स्कॉलरशिप मिळाल्या आहेत. त्यांनी विद्यापीठामध्ये गेली २८ वर्ष वेगवेगळ्या पदांवर काम केले असून त्यांचे संशोधन, शिक्षण आणि कृषि विस्तार क्षेत्रामध्ये मोठे योगदान आहे. श्री. शेट्ये हे जुलै २०१६ पासून कृषि संशोधन केंद्र, फोंडाघाट येथे केंद्र प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. याच कालावधीमध्ये त्यांनी प्लॅस्टिक अच्छादनावरील भात – मधुमका – मूग लागवडीचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. आज पर्यंत त्यांचे १३ संशोधनावर आधारीत शिफारशी, रत्नागिरी – २४, रत्नागिरी- ५, रत्नागिरी-६, रत्नागिरी- ७, रत्नागिरी-८, ट्रॉम्बे कर्जत कोलम, कर्जत शताब्दी या भाताच्या जाती, सहयाद्री ५ ही संकरीत भात जात, कोकण भुरत्न ही भुईमूगाची जात, दापोली ३ ही नाचणीची जात, कोकण सात्विक ही वरीची जात आणि कोकण भेंडी ही भेंडीची जात विकसित करण्यामध्ये योगदान आहे. त्यांनी एकूण २८ संशोधनावर आधारील लेख प्रसिध्द केले असून शेतकऱ्यांसाठी विविध विषयांवर ७ मराठीतून लेख सुध्दा प्रसिध्द केले आहेत. ७ आकाशवाणी आणि २ दुरदर्शन कार्यक्रमातूनही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आहे. नापणे येथे ऊस संशोधन केंद्र स्थापनेमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. या संशोधन केंद्रामुळे कोकणातील ऊस लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.