मालवण भंडारी हायस्कूलच्या पार्थ मेस्त्रीच्या कलाकृतीची आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंद…

337

 

जुबेर खान / मालवण  : आषाढी एकादशी निमित्त तुळशीच्या पानावर अवघ्या १८ मिनिटात रांगोळीतून श्री विठ्ठलाची आकर्षक प्रतिमा साकारणाऱ्या मालवण येथील भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कूलमधील इयत्ता दहावीचा विद्यार्थी कु. पार्थ साईनाथ मेस्त्री याच्या या कामगिरीची दखल आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स ने घेऊन सर्वात जलद गतीने तुळशीच्या पानावर रांगोळी साकारल्या बद्दल पार्थ मेस्त्रीच्या कलाकृतीची नोंद केली आहे. लहान वयातच आपल्या अद्भुत अशा कलेने सर्वांची मने जिंकणाऱ्या पार्थच्या यशात या नोंदीमुळे मानाचा तुरा खोवला गेला असून त्याच्या या आंतरराष्ट्रीय स्तरावरील यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

मालवण येथील भंडारी हायस्कुलचा विद्यार्थी पार्थ मेस्त्री हा उत्तम चित्रकार व रांगोळीकार असून लहान वयातच त्याने आपल्या कलेची प्रतिभा दाखवली आहे. विविध स्पर्धामध्ये पार्थ याने सुंदर अशा रांगोळ्या काढून अनेक पारितोषिकेही मिळविली आहेत. आषाढी एकादशी निमित्त त्याने तुळशीच्या पानावर विठ्ठलाची रांगोळी साकारली होती. ३ × १.५ सेंटीमीटर आकाराच्या तुळशीच्या पानावर श्री देव विठ्ठलाची सुंदर व आकर्षक रांगोळी अवघ्या १८ मिनिटात पार्थ याने साकारली होती. तुळशीच्या एवढ्या छोट्या आकाराच्या पानावर इतक्या कमी वेळेत रांगोळी साकारल्याबद्दल त्यावेळी पार्थ याचे सर्वत्र कौतुक झाले होते. रांगोळी द्वारे केलेली अत्यंत बारीक कलाकूसर सर्वांच्या पसंतीस उतरली होती.

पार्थ मेस्त्री याच्या या कामगिरीची दखल आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स ने घेत पार्थच्या कलाकृतीची विक्रम म्हणून नोंद केली आहे. पार्थ याने वयाच्या १४ व्या वर्षी सर्वात जलद म्हणजेच १८ मिनिट १० सेकंद व ४८ मिलीसेकंद मध्ये ३ × १.५ सेमी आकाराच्या तुळशीच्या पानावर विठ्ठलाच्या प्रतिमेची रांगोळी साकारली अशी नोंद आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये झाली आहे. या नोंदीचे प्रमाणपत्र, पदक व आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्सचे पुस्तक पार्थ याला प्राप्त झाले आहे.

या नोंदीमुळे पार्थ याची ही कलाकृती आशिया खंडात एक विक्रम बनली आहे. या नोंदी मुळे पार्थ ची कलाकृती आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील पोहचली आहे. पार्थ याच्या आजपर्यंतच्या कामगिरीतील हा एक सर्वोच्च क्षण आहे. पार्थ याच्या या उत्तुंग यशाबद्दल सर्वाकडून त्याचे कौतुक व अभिनंदन होत आहे.