मुंबईत ‘कोसळ’धार, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी लोकल्सचा वेग मंदावला

54

मुंबईत आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. यामुळे रेल्वे सेवेवर परिणाम झाला आहे. पश्चिम रेल्वे मार्ग, मध्य रेल्वे मार्ग आणि हार्बर रेल्वे मार्ग अशा तिन्ही मार्गांवरची लोकल वाहतूक १५ ते २० मिनिटे उशिराने सुरू आहे. मुंबईतल्या अनेक सखल भागांमध्ये पाणी साठण्यास सुरूवात झाली आहे. रविवारी दुपारी काहीशी विश्रांती घेतलेल्या पावसाने रात्रीपासून दमदार बॅटिंग सुरू केली आहे. त्याचा परिणाम मुंबईच्या लोकल वाहतुकीवर झाला आहे.

हिंदमाता, किंग्ज सर्कल, अंधेरी या भागांमध्ये पाणी साठण्यास सुरूवात झाली आहे. दादर, परळ परिसरातही शाळकरी मुलांना पावसातून आणि साठलेल्या पाण्यातून वाट काढावी लागली. तसंच ऑफिसला पोहचणाऱ्या चाकरमान्यांनाही चांगलाच उशीर होतो आहे. वांद्रे येथील एस. व्ही रोड भागातही पाणी साठण्यास सुरूवात झाली आहे. घाटकोपर ते कुर्ला या स्थानकांदरम्यान लोकल्स सुमारे २० मिनिटे थांबत आहेत.

मरीन लाइन्स स्थानकात ओव्हरहेड वायर तुटल्याने चर्चगेट ते मरिन लाईन्स वाहतूक बंद करण्यात आली आहे. तर  चर्नी रोड भागात एक ट्रेन बंद पडल्याने जलद लोकल्सची वाहतूक धीम्या मार्गावरून वळवण्यात आली आहे.

नवी मुंबईतही चांगलाच पाऊस पडतो आहे त्या ठिकाणीही काही भागांमध्ये पाणी साठण्यास सुरूवात झाली आहे. कुर्ला ते सायन दरम्यान रूळांवर पाणी साठलं आहे असंही समजतं आहे. नवी मुंबईतील वाशी, पनवेल, खारघर भागात चांगलाच पाऊस पडतो आहे. या ठिकाणही पाणी साठण्यास सुरूवात झाली आहे.