थकीत कर्जासाठी तत्कालीन सरकार जबाबदार

10

वृत्तसंस्था, मुंबई 

थकीत कर्जांच्या समस्येस बँका, रिझर्व्ह बँक व तत्कालीन सत्ताधारी कारणीभूत असल्याची खळबळजनक कबुली रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डॉ. ऊर्जित पटेल यांनी दिली आहे. स्टॅनफोर्ड विद्यापीठात दिलेल्या व्याख्यानादरम्यान त्यांनी हे मतप्रदर्शन केले. केंद्र सरकारशी झालेल्या मतभेदांनंतर पटेल यांनी गव्हर्नरपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर त्यांनी प्रथमच या विषयावर भाष्य केले आहे.

२०१४पर्यंत बँकांनी भरमसाट प्रमाणात कर्जे वाटली. त्या स्थितीत तत्कालीन सरकारनेही आपले कर्तव्य पूर्णपणे निभावले नाही. तसेच, या प्रकरणाची रिझर्व्ह बँकेने उशिरा दखल घेतली, अशी स्पष्टोक्ती पटेल यांनी केली. सद्यस्थितीत निर्माण झालेल्या थकीत कर्जाच्या समस्येस संबंधित सर्व घटक म्हणजे बँका, रिझर्व्ह बँक व तत्कालीन सरकारच जबाबदार आहे, असे ते म्हणाले.

पटेल यांनी ज्या कालावधीचा उल्लेख केला आहे, त्यावेळी केंद्रात काँग्रेसप्रणित यूपीए सरकार सत्तेत होते. तर, आरबीआयच्या गव्हर्नरपदी रघुराम राजन होते.