आरोसला निवृत्त मुख्याध्यापकाची आत्महत्या

19

वार्ताहर / सातार्डा:

आरोस-दांडेली (धनगरवाडी) येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक यशवंत विठ्ठल आरोसकर (73) यांनी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. हा घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. याबाबत पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. आरोसकर यांनी आजाराला कंटाळून आत्महत्या केली असावी, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.

यशवंत आरोसकर हे घरातील पहिल्या मजल्यावर सामान ठेवलेल्या खोलीतील छपराच्या लाकडी वाशाला नायलॉन दोरीने गळफास लावलेल्या स्थितीत सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास त्यांच्या कुटुंबियांच्या निदर्शनास आले. त्यांनी या घटनेची माहिती सातार्डा पोलीस दूरक्षेत्रात दिली. घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक धनंजय चव्हाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सदानंद साळुंखे, कॉन्स्टेबल लक्ष्मण परब, रामचंद्र साटेलकर यांनी पंचनामा केला. त्यानंतर मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

यशवंत आरोसकर यांनी शिक्षक, मुख्याध्यापक म्हणून काम केले. त्यांचा समाजकार्यातही सहभाग होता. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. कोंडुरा तिठा येथील पारिजात मंगल कार्यालयाचे मालक व भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी अमोल आरोसकर यांचे ते वडील तर पोलीस पाटील महेश आरोसकर यांचे ते काका होत.