कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण पुन्हा एकदा करण्यात येणार…

11

वैभववाडी/प्रतिनिधी:-

मंजूर होऊनही रखडलेल्या कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्गाच्या कामासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.या मार्गाचे पुन्हा एकदा सर्वेक्षण करण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक नरेश लल्लन यांनी दिली.

लल्लन हे शुक्रवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी कोल्हापूर रेल्वेस्थानकाची पाहणी करीत अधिकाऱ्यांना आवश्यक सूचनाही केल्या.

कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्गाला २०१६-१७ मध्ये तत्कालीन रेल्वमंत्री सुरेश प्रभू यांनी मंजुरी दिली होती; मात्र त्यानंतर पुढे काहीच झाले नाही.

१०७ किलोमीटरच्या या मार्गाचे याआधीही सर्वेक्षण झाले आहे; मात्र या मार्गावर अनेक ठिकाणी घाट असल्याने उतार जास्त आहेत. हे उतार कमी करण्यासाठी फेरसर्वेक्षण करण्यात येणार असून, त्यासाठीची निविदा लवकरच काढण्यात येणार असल्याचे लल्लन यांनी सांगितले. यावेळी रेल्वेच्या पुणे विभागीय प्रबंधक इंदू दुबे, स्वप्नील नीला, रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य शिवनाथ बियाणी, जयेश ओस्वाल उपस्थित होते.