झाडावरून पडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; नाधवडे येथील घटना…

40

वैभववाडी/प्रतिनिधी:-

झाडावरून पडून संजय वामन ताम्हणकर वय 40 रा. साळीस्ते ता. कणकवली या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना नाधवडे येथे घडली. ही घटना बुधवार 24 मे रोजी सकाळी 10 वा. घडली. या घटनेची वैभववाडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली आहे.

साळीस्ते कणकवली वरून दिलीप दत्ताराम ताम्हणकर व संजय वामन ताम्हणकर हे दोघे नाधवडे येथील महादेव तुकाराम पावस्कर यांची झाडे तोडण्यासाठी आले होते. उंच झाड तोडण्यासाठी संजय वामन ताम्हणकर हे झाडावर चढले व दोरी वरती टाकत असताना दुसऱ्या हातात असलेली फांदी तुटल्याने संजय ताम्हणकर हे झाडावरून खाली पडले. त्यांच्या डोक्याला व कमरेला दुखापत झाली. यावेळी त्यांचे नाकातूनही रक्त येत होते.

तेथे उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी संजय ताम्हणकर यांना तात्काळ वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथेच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची खबर दिलीप दत्ताराम ताम्हणकर यांनी वैभववाडी पोलीस स्टेशनला दिली. वैभववाडी पोलिसांनी या घटनेची आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली आहे. अधिक तपास वैभववाडी पोलीस करत आहेत.